Join us

​राहुल चौधरी यांच्या इबलिसचा लोगो पाहिला का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2018 16:02 IST

५४ व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सहा नामांकनं आणि चार राज्य पुरस्कार पटकावणाऱ्या 'बंदूक्या' सिनेमाचे दिग्दर्शक राहुल मनोहर ...

५४ व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सहा नामांकनं आणि चार राज्य पुरस्कार पटकावणाऱ्या 'बंदूक्या' सिनेमाचे दिग्दर्शक राहुल मनोहर चौधरी हे तेशा गर्लचाईल्ड आणि अभि फिल्म्स निर्मित 'इबलिस' सिनेमा घेऊन येत आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन देखील राहुल चौधरी यांनी केले आहे. फेसबुकच्या माध्यमातून इबलिस सिनेमाचा लोगो अनावरण करण्यात आला. सिनेमाचा लोगो हा सिनेमा नक्की काय आहे हे सांगण्याची पहिली पायरी असते. सिनेमाचे कॉन्सेप्ट, गोषवारा म्हणजेच एकंदरीत ओळख दाखविण्याचे काम सिनेमाचा लोगो करत असतो असे राहुल चौधरी म्हणाले. विविध सोशल माध्यमांतील प्रतिक्रिया पाहता इबलिस सिनेमाचा लोगो उत्सुकता वाढवत आहे. या लोगोमध्ये एका भला मोठा फळा दिसत असून या फळ्यावर 'धक्का लागी बुक्का' असा सुविचार लिहिलेला असून हीच या चित्रपटाची दमदार पंचलाईन आहे. तसेच या फळ्यावर वार, दिनांक, विषय, इयत्ता, पट देखील लिहिलेला आहे. तसेच या लोगोच्या फोटोवर पट्टी, पेन्सिल, रबर अशा गोष्टी देखील दिसत आहेत. "लवकरच होणार लढाई" असे म्हणत हा चित्रपट २०१८ मध्येच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे समजतेय.इबलिस हा चित्रपट कोणत्या विषयावर असणार, या चित्रपटामध्ये कोणकोणत्या कलाकारांच्या मुख्य भूमिका असणार याबाबत या चित्रपटाच्या टीमने मौन राखणेच पसंत केले आहे. पण या चित्रपटाचा लोगो पाहाता या चित्रपटाचा विषय हा शालेय जीवनाशी संबंधित असल्याचे दिसून येत आहे. 'बंदूक्या' या सिनेमात अभिनेता शशांक शेंडे यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. या सिनेमाचे दिग्दर्शन राहुल मनोहर चौधरी यांनी केले असून यात आतिषा नाईक, नामदेव मुरकुटे, निलेश बोरसे यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा सिनेमा राहुल चौधरी आणि नामदेव मुरकटे यांच्या संकल्पनेतून साकारला होता. या सिनेमाची गाणी तुफान हिट ठरली होती. आदर्श शिंदेच्या रांगड्या आवाजातलं माझा ईर या गाण्याने तर तरुणाईला वेड लावले होते. या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना आणि समीक्षकांना दोघांना देखील भावली होती. Also Read : बंदुक्याचे दिग्दर्शक राहुल चौधरी करणार निर्मिती