Join us  

'भन्नाट भानू' चित्रपटातील भानू आठवतेय ना, आता ओळखणंही झालंय कठीण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 7:00 AM

१९८२ साली भन्नाट भानू हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटातील भानूची भूमिका खूपच लोकप्रिय ठरली होती.

१९८२ साली भन्नाट भानू हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाच्या कथानकासोबतच यातील गाण्यांनीदेखील प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. या चित्रपटातील भानूची भूमिका खूपच लोकप्रिय ठरली होती. ही भूमिका साकारली होती अभिनेत्री सुषमा शिरोमणी यांनी. सुषमा यांनी या चित्रपटात अभिनया व्यतिरिक्त निर्मिती, दिग्दर्शन आणि कथा लेखनाची जबाबदारी पेलली होती. या चित्रपटात त्यांच्याशिवाय  सुलोचना, निळू फुले, अशोक सराफ, श्रीकांत मोघे, दत्ता भट, आत्माराम भेंडे, अरविंद देशपांडे, सुरेखा राणे, रविराज, आशू, मच्छिंद्र कांबळी, प्रकाश फडतरे, उषा नाईक हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. सुषमा शिरोमणी यांनी या चित्रपटाशिवाय बऱ्याच चित्रपटात काम केले आहे. आता त्या सिनेइंडस्ट्रीपासून दुरावल्या आहेत आणि आता त्यांना ओळखणंदेखील कठीण झाले आहे.

सुषमा शिरोमणी हे नाव घेतले की ‘भिंगरी’, ‘फटाकडी’, ‘मोसंबी नारिंगी’ हे चित्रपट डोळ्यासमोर येतात. १९७६ ते १९८६ या दहा वर्षांच्या कालावधीत सुषमा शिरोमणी यांनी बऱ्याच चित्रपटांची निर्मिती केली असली तरी त्यानंतरही अनेक वर्षे त्यांच्या चित्रपटांची आणि त्यातील भूमिकांची जादू टिकून होती. त्यांचे सगळे चित्रपट स्त्रीप्रधान होते आणि विशेष म्हणजे या सगळ्या भूमिका पडद्यावर त्यांनी स्वत: साकारल्या होत्या.

इतकेच नाही तर आयटम साँग ही संकल्पना मराठी चित्रपटांमध्ये मराठमोळ्या ढंगात त्यांनीच लोकप्रिय केली होती. त्यांच्या ‘भिंगरी’ चित्रपटातील गाण्यावर अरूणा इराणी, ‘फटाकडी’ चित्रपटात रेखा, ‘मोसंबी नारिंगी’मध्ये जितेंद्र, ‘गुलछडी’मध्ये रती अग्निहोत्री आणि ‘भन्नाट भानू’मध्ये मौसमी चटर्जी या अभिनेत्रींनी नृत्य केले होते.  

इम्पा या चित्रपट निर्मात्यांच्या संघटनेतही त्या अनेक वर्षे सक्रिय राहिल्या. मिथुन चक्रवर्ती, धर्मेद्र, नीलम, मीनाक्षी शेषाद्री अशा कलाकारांना घेऊन त्यांनी ‘प्यार का कर्ज’या हिंदी चित्रपटाचीही निर्मिती केली.

सिनेइंडस्ट्रीची कोणतीही पार्श्वभूमी नसताना सुषमा शिरोमणी यांनी स्वःकर्तृत्वावर मिळवलेले हे यश वाखाणण्याजोगे आहे.

टॅग्स :अशोक सराफ