'दिल दोस्ती दुनियादारी' ही झी वाहिनीवरील मालिका चांगलीच गाजली होती. या मालिकेतील सुजय, कैवल्य, आशु, अॅना, मीनल, रेश्मा, राकेश, सॅम, किंजल, निशा, रेवा, कबीर या सगळ्याच भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या होत्या. आज ही मालिका संपून काही वर्षं लोटली असली तरी ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच स्मरणात आहे. या मालिकेत सुव्रत जोशी, अमेय वाघ, पुष्कराज चिरपुटकर, पूजा ठोंबरे, सखी गोखले, स्वानंदी टिकेकर, ललित प्रभाकर, मंजिरी पुपाला यांच्या मुख्य भूमिका होत्या. या कार्यक्रमाची लोकप्रियता प्रचंड असल्याने या मालिकेचा दुसरा सिझन म्हणजेच दिल दोस्ती दोबारा हा कार्यक्रम देखील प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या कार्यक्रमाला देखील प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळाले होते. आता या कार्यक्रमातील एक अभिनेत्री मोठ्या पडद्यावर काम करण्यास सज्ज झाली आहे.
दिल दोस्ती दुनियादारी या लोकप्रिय मालिकेतील 'निशा' तुम्हाला आठवतेय का? या मालिकेत ती राकेशच्या प्रेयसीच्या भूमिकेत झळकली होती. तिची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. ही व्यक्तिरेखा अभिनेत्री मंजिरी पुपालाने साकारली होती. मंजिरीला या मालिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. आता ही प्रेक्षकांची लाडकी मंजिरी लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. सचिन दरेकर दिग्दर्शित 'पार्टी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ती या सिनेमात 'दिपाली' नामक एका बिनधास्त मुलीची व्यक्तिरेखा साकारणार आहे. यापूर्वी मंजिरीने हिंदी आणि मराठी नाटकांमध्ये काम केले आहे. ती नुकतीच पल्लवी जोशीची मुख्य भूमिका असलेल्या 'ग्रहण' मालिकेत देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती.
'पार्टी' हा सिनेमा मैत्रीवर आधारित असून हा सिनेमा ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. नवविधा प्रोडक्शन प्रस्तुत आणि सुपरहिट 'बकेट लिस्ट' सिनेमाचे निर्माते डार्क हॉर्स प्रोडक्शन्स निर्मित 'पार्टी' या सिनेमात तिच्यासोबत सुव्रत जोशी, अक्षय टांकसाळे, स्तवन शिंदे, रोहित हळदीकर आणि प्राजक्ता माळी हे कलाकारदेखील मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. विशेष म्हणजे सुव्रत जोशी आणि मंजिरीने दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेत एकत्र काम केले होते.