Join us  

रसिका सुनीलच्या 'गॅटमॅट' चित्रपटाचा ट्रेलर तुम्ही पाहिला का?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 3:13 PM

तरुणाईने बहरलेल्या 'गॅटमॅट' सिनेमाच्या या मनोरंजक ट्रेलरने प्रेक्षकांची मनं जिंकलीच. पण त्याचबरोबर सिनेमात नक्की काय पाहायला मिळणार याची उत्सुकता देखील निर्माण केली.

'प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे प्रेम असतं... तुमचं आमचं सेम असतं...' ही मंगेश पाडगावकरांची कविता प्रेमवीरांमध्ये प्रसिद्ध आहे. प्रेमात पाडणाऱ्या या कवितेने अनेकांचे 'गॅटमॅट' देखील जुळवून दिले आहे. गोड आणि गुलाबी असणारे हे प्रेम जुळण्यासाठी अनेक मशागती कराव्या लागतात. प्रेमाचे हे 'गॅटमॅट' जुळताना बऱ्याचदा धांदल उडवणारे किस्सेदेखील घडतात. अवधूत गुप्ते प्रस्तुत आणि यशराज इंडस्ट्रीज निर्मित 'गॅटमॅट' हा सिनेमा यासारख्याच मजेशीर किस्स्यांची भेट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. येत्या १६ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत असलेला हा सिनेमा प्रेमीयुगुलांसाठी पर्वणी ठरणार असून नुकतेच या सिनेमाच्या ट्रेलरचे मोठ्या दिमाखात अनावरण करण्यात आले. मुंबईतील वरळी येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात 'गॅटमॅट' सिनेमाच्या संपूर्ण टीमने हजेरी लावली होती. 

तरुणाईने बहरलेल्या 'गॅटमॅट' सिनेमाच्या या मनोरंजक ट्रेलरने उपस्थितांची मनं जिंकलीच. पण त्याचबरोबर सिनेमात नक्की काय पाहायला मिळणार याची उत्सुकता देखील निर्माण केली. निशीथ श्रीवास्तव दिग्दर्शित या सिनेमाचे ट्रेलर, कॉलेज विश्वाची रंगतदार सफर प्रेक्षकांना घडवून आणते. प्रत्येक कॉलेज कट्ट्यावर दिसणारी लैला-मजनूची जोडी यातही आपल्याला दिसून येते. सिनेमात मुख्य भूमिका पार पाडणारे अक्षय टंकसाळे, निखिल वैरागर, रसिका सुनील आणि पूर्णिमा डे हे कलाकारदेखील आपल्याला या ट्रेलरमधून दिसून येतात. शिवाय रंग्या आणि बगळ्याच्या 'गॅटमॅट' संस्थेचे चालणारे गमतीदार कामकाजदेखील प्रेक्षकांचे भरघोस मनोरंजन करते. मैत्री, प्रेम आणि रोमान्स दाखवणारे 'गॅटमॅट' सिनेमाचे हे ट्रेलर प्रेक्षकांना नॉस्टेलजीक करण्यास यशस्वी ठरत आहे. 'गॅटमॅट' सिनेमाच्या या गमतीदार ट्रेलरबरोबरच सिनेमातील गाण्यांचदेखील अनावरण करण्यात आलं. 

सध्या सर्वत्र गाजत असलेलं सचिन पाठक लिखित, अवधूत गुप्ते यांच्या आवाजातलं 'गॅटमॅट' सिनेमाचं शीर्षकगीत यादरम्यान उपस्थितांना दाखविण्यात आलं. त्याचप्रमाणे आनंद शिंदे यांच्या दमदार आवाजातील 'वरात' हे गाणंदेखील सादर करण्यात आलं. वरात गाजवणारं हे गाणं अभिजित खणकर यांनी शब्दबद्ध केलं आहे. शिवाय 'गॅटमॅट' सिनेमातील सर्व गाण्यांना सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक समीर साप्तीस्करचं संगीत लाभलं आहे. राजेंद्रप्रसाद श्रीवास्तव यांची निर्मिती असलेला हा सिनेमा, प्रेमात पडलेल्यांना आणि प्रेमात पडू इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी मनोरंजनाची मेजवानी ठरणार आहे. 

 

टॅग्स :रसिका सुनिल