Join us  

सुपरहिट 'दे धक्का' सिनेमाचा येणार सिक्वेल, या तारखेला येणार रसिकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 2:23 PM

दे धक्का या चित्रपटाच्या कथेने रसिकांची पसंती मिळवली त्यामुळे या सिनेमाची भुरळ बॉलिवूडलाही पडली होती. दे धक्का सिनेमाचे हिंदीतही रिमेक बनणार असल्याची चर्चाही सुरू होती.

मराठी चित्रपटांची सध्या देशातच नाही, तर जगभरात चर्चा आहे.  महेश मांजरेकर यांच्या दे धक्का या चित्रपटानं मराठी चित्रपटसृष्टीला खऱ्या अर्थानं धक्का दिला होता. कारण या चित्रपटानं २००८ मध्ये दहा कोटींचा व्यवसाय केला होता. आता पुन्हा एकदा ११ वर्षांनी मराठी चित्रपटसृष्टीला धक्का मिळणार आहे. कारण महेश मांजरेकर नव्या वर्षात दे 'धक्का २' हा चित्रपट घेऊन येत असून, ३ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 'दे धक्का २' चं पोस्टर नुकतंच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं. महेश मांजरेकर आणि सुदेश मांजरेकर 'दे धक्का २ 'चं दिग्दर्शन करणार आहेत. दे धक्का  चित्रपटामधील मकरंद अनासपूरे, शिवाजी साटम, मेधा मांजरेकर आणि सिद्धार्थ जाधव ही स्टारकास्टही दे धक्का २ मध्ये दिसेल. मात्र बाकी कलाकार कोण असतील हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. चित्रपटाच्या पोस्टरवर वेलकम टू लंडन असं म्हटलं आहे. त्यामुळे चित्रपटाचं महत्त्वाचं कनेक्शन लंडनशी असणार हे कळतं आहे. आता ते काय असेल, हे जाणून घेण्यासाठी थोडी वाट पहावी लागेल. मात्र, चित्रपटाचं पोस्टर अत्यंत फ्रेश आणि रंजक आहे. त्यामुळे चित्रपटही नक्कीच धमाकेदर असेल यात शंका नाही.

दे धक्का या चित्रपटाच्या कथेने रसिकांची पसंती मिळवली त्यामुळे या सिनेमाची भुरळ बॉलिवूडलाही पडली होती. दे धक्का सिनेमाचे हिंदीतही रिमेक बनणार असल्याची चर्चाही सुरू होती. संजय दत्त या सिनेमाचा रिमेक बनवणार असल्याची सांगितले जात होते. अद्याप तरी हिंदीतील रिमेकची घोषणा करण्यात आलेली नसून आता मराठीतच या सिनेमाचा सिक्वेल येणार म्हटल्यावर पुन्हा एकदा रसिकांची मनोरंनाची पर्वणीच मिळणार हे मात्र नक्की.

मराठीतील ‘दे धक्का’ हा सिनेमा एका हॉलिवूडपटावर आधारित होता. हॉलिवूडमध्ये गाजलेल्या ‘लिटील मिस सनशाईन’ या २00६ मध्ये ‘रिलीज झालेल्या सिनेमाची कथा आणि २00८ मध्ये मराठी रुपेरी पडद्यावर झळकलेल्या ‘दे धक्का’ या सिनेमाची कथा सारखीच होती.. हॉलिवूडच्या ‘लिटील मिस सनशाईन’ या सिनेमात एका मुलीला सौंदर्य स्पर्धेत सहभागी होता यावं यासाठी बसनं कशा रीतीने प्रवास करते आणि त्यांना कोणत्या अडचणींना तोंड द्यावं लागते हे दाखवण्यात आलं होतं.. तर दे धक्का या सिनेमात बसची जागा टमटमनं घेतली आणि एका डान्स स्पर्धेसाठी मुलीला नेण्याची धावपळ दाखवण्यात आली होती.

टॅग्स :महेश मांजरेकर