Join us  

'सर्व लाईन व्यस्त आहेत’ विनोदी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2019 8:00 AM

प्रेक्षकांचे विनोदी कथेतून भन्नाट मनोरंजन करण्यासाठी मल्टी स्टारर सिनेमा ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे.

ठळक मुद्देया सिनेमाची कथा बाब्या आणि समीर या दोन मित्रांची आहेदिग्दर्शक म्हणून प्रदीप यांचा हा पहिला सिनेमा आहे

आपल्या मराठी सिनेमांत वेगवेगळ्या जॉनरचे सिनेमे येत आहेत. नवीन कथा, नवीन कलाकार, नवीन जोड्या सिनेमांत पाहायला मिळत आहे. नवीन वर्षाची सुरुवात पण तितक्याच धमाकेदार पध्दतीने करण्यासाठी आपली मराठी सिनेसृष्टी सज्ज झाली आहे. प्रेक्षकांचे विनोदी कथेतून भन्नाट मनोरंजन करण्यासाठी मल्टी स्टारर सिनेमा ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे.

‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ सिनेमाची प्रस्तुती अमोल उतेकर यांनी केली असून निर्मिती स्टेलारीया स्टुडीयोने केली आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक प्रदिप रघुनाथ मेस्त्री यांनीच या सिनेमाची कथा लिहिली असून या सिनेमात सिध्दार्थ जाधव, सौरभ गोखले, संस्कृती बालगुडे, स्मिता शेवाळे, हेमांगी कवी, नीथा शेट्टी-साळवी आणि राणी अग्रवाल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तसेच त्यांच्या सोबतीला, कथा आणखी इंटरेस्टिंग बनवण्यासाठी महेश मांजरेकर, कमलाकर सातपुते, माधवी सोमण, प्रियंका मुणगेकर, संध्या कुटे, सतीश आगाशे, शिवाजी रेडकर, हितेश संपत आणि गौरव मोरे या कलाकारांनी देखील हलक्या-फुलक्या पण प्रेक्षकांना नक्की हसवतील अशा भूमिका साकारल्या आहेत.

दिग्दर्शक म्हणून प्रदीप यांचा हा पहिला सिनेमा आहे आणि निर्माते अमोल यांचा देखील हा पहिलाच मराठी सिनेमा आहे. पहिल्या मराठी सिनेमाची सुरुवात विनोदी जॉनरने करावी आणि त्यात पण प्रेक्षकांच्या लाडक्या कलाकारांची निवड करावी ही सर्वांसाठीच खूप खास गोष्ट आहे. कारण प्रेक्षक वर्गांना रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून थोडंसं रिलॅक्स करण्यासाठी निखळ मनोरंजन करणा-या सिनेमांची मदत होते. असाच निखळ मनोरंजन करणारा, कॉमेडी, इमोशन, वेगळ्या प्रकारची ऍक्शनने परिपूर्ण असा ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ सिनेमा आजपासून प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.

प्रेम, लग्न या घटना प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी घडणारच असतात. प्रेयसी-प्रियकर, बायको-नवरा या भूमिकेत पण शिरावं लागतं. पण या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात कधी येतात, कशा येतात, त्यावेळी कोणाची मदत मिळते, सर्व काही सरळ, सुरळित पण घडते का, या सर्व प्रश्नांची उत्तरे या सिनेमात मिळणार आहेत.

या सिनेमाची कथा बाब्या आणि समीर या दोन मित्रांची आहे. बाब्या हा असा व्यक्ती आहे ज्याच्याकडे प्रत्येक समस्यांवर उपाय हा लगेच उपलब्धच असतो. समीर मात्र साधा,सरळ,सज्जन मुलगा. कोणाशी जास्त न बोलणं, मुलींशी तर फार क्वचितच बोलणं हा समीरचा स्वभाव. मुली पटवण्यात तरबेज असणारा बाब्या समीरचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी, मुली पटवण्यासाठी काही लव्ह टिप्स देतो. बाब्याच्या मार्गदर्शनाखाली समीर मुलींशी बोलायला लागतो आणि त्याची हळूहळू प्रगती होत जाते. समीच्या आयुष्यात मुली आल्यामुळे उडणारा गोंधळ म्हणजे ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’.

या सिनेमातील ग्लॅमरस, नटखट, प्रेमळ भूमिका साकारणा-या अभिनेत्री संस्कृती बालगुडे, स्मिता शेवाळे, हेमांगी कवी, नीथा शेट्टी-साळवी आणि राणी अग्रवाल यांनी सिनेमात धमाल केली आहे. त्यांची भूमिका ही प्रत्येकाला हसवेल आणि त्यांचे मनोरंजन करेल अशीच झाली आहे. विनोदी भूमिकेत या पाचही अभिनेत्रींना एकत्र पाहणे, महेश मांजरेकरांची ‘गडबडे बाबा’ची मजेशीर भूमिका, सिध्दार्थ आणि समीर ही मित्रांची नवीन जोडी या सर्व गोष्टींमुळे हा सिनेमा प्रेक्षकांसाठी नक्कीच एंटरटेनमेंट पॅकेज असणार आहे.

 

टॅग्स :सिद्धार्थ जाधवसौरभ गोखलेहेमांगी कवी