Join us

चेतन चिटणीस बनला बंगाली बाबू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2016 17:07 IST

फोटोकॉपी या चित्रपटातून अभिनेता चेतन चिटणीस हा प्रेक्षकांना पाहायला मिळाला. तसेच नुकताच त्याचा वजनादार हा चित्रपटदेखील प्रदर्शित झाला आहे. ...

फोटोकॉपी या चित्रपटातून अभिनेता चेतन चिटणीस हा प्रेक्षकांना पाहायला मिळाला. तसेच नुकताच त्याचा वजनादार हा चित्रपटदेखील प्रदर्शित झाला आहे. आता, चेतन हा बंगाली बाबू बनण्यास तयार झाला आहे. कारण नुकताच त्याच्या एका हिंदी चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण झाले आहे. या चित्रपटामध्ये तो बंगाली बाबू दाखविण्यात आला असल्याचे चेतनने लोकमत सीएनएक्सला सांगितले. चेतन सांगतो, पाखी या माझ्या चित्रपटाचे नाव आहे. तसेच हिंदी चित्रपट असला तरी, या चित्रपटाला संपूर्ण बंगाली टच दिला आहे. या चित्रपटाची चित्रिकरणदेखील कोलकत्ता येथे झाले आहे. त्याचप्रमाणे दिग्दर्शकापासून संपूर्ण टीमच बंगाली असल्याचे त्याने यावेळी सांगितले. तो म्हणाला, या चित्रपटात एक मुलगी दाखविण्यात आली आहे. ती बास्केटबॉल खेळाडू असते. मात्र परिस्थिती अभावी तिला चांगला खेळाडू बनता येत नाही. अशावेळी एक मुलगा तिच्या मदतीला येतो. याच मुलाची भूमिका मी साकारली आहे. तसेच तो स्वत:साठी जगत नसतो. तो गावातील इतर लोकांसाठी जगत असतो.  त्याचप्रमाणे हा चित्रपट करताना मला शिकायला खूप मिळाले आहे. यासाठी पाच ते सहा दिवसांचा वर्कशॉप घेण्यात आला होता. हा वर्कशॉप शोहाग सेन यांनी घेतला होता. त्यांच्याजवळ मोठे कलाकार वर्कशॉप घेत असतात. अशा शोहाग सेनकडून मार्गदर्शन मिळाल्याने अधिक आनंद होत असल्याचे त्याने यावेळी सांगितले. त्याचप्रमाणे हा चित्रपट पुढच्या महिन्यात प्रदर्शित होणार असून, अनेक फेस्टीव्हलमध्येदेखील हा चित्रपट दाखविण्यात येणार असल्याचेदेखील त्याने यावेळी सांगितले. फोटोकॉपी हा त्याचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री पर्ण पेठे झळकली आहे. या चित्रपटाचीदेखील चर्चा चांगलीच रंगली होती. त्यामुळे या मराठमोठया चेतनची बंगाली बाबूची भूमिका पाहण्यासाठी प्रेक्षकदेखील उत्सुक आहेत.