Join us  

सोशल मीडियावर सैराट फेम आकाश ठोसरच्या नावाने फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2017 11:38 AM

सेलिब्रिटीच्या नावाने बनावट अकाऊंट बनवून लोकांना गंडा घालणं अशा घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. एखादा सेलिब्रिटीच आपल्याशी बोलत असल्याचे ...

सेलिब्रिटीच्या नावाने बनावट अकाऊंट बनवून लोकांना गंडा घालणं अशा घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. एखादा सेलिब्रिटीच आपल्याशी बोलत असल्याचे वाटत असल्याने नागरिक अशा बनावट अकाऊंट्सना सहज बळी पडतात. सध्या सोशल मीडियावर सैराट फेम परशा म्हणजेच आकाश ठोसरच्या नावाचा गैरवापर करुन नागरिकांना फसवण्याचा प्रकार सुरु झाला आहे. आकाशच्या नावाने सोशल मीडियावर एक बनावट फेसबुक अकाऊंट बनवण्यात आले आहे. या फेसबुक अकाऊंटच्या माध्यमातून भोळ्या भाबड्या तरुण-तरुणींची फसवणूक राजरोसपणे सुरु आहे. नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी एक संधी अशा आशयाची पोस्ट सध्या सोशल मीडियावर आकाश ठोसरच्या फेसबुक अकाऊंटवरुन व्हायरल झाली आहे. मराठी किंवा हिंदीमध्ये काम करायचे असेल तर सिलेक्शन सुरू आहे. तुमची माहिती आणि फोटो या व्हॉटसअप नंबरवर पाठवा. अशा आशयाची पोस्ट आकाश ठोसरच्या नावाने पाठवण्यात आली आहे. या पोस्टनंतर अनेकांनी संबधित नंबरवर फोन केल्याचेही समोर आले आहे. काही जणांकडे पैशाची मागणीही करण्यात आल्याची उदाहरणे आता समोर येऊ लागली आहेत. एक प्रसिद्ध मराठी वाहिनी आणि आकाशच्या नावाने ही फसवणूक सुरु आहे. त्यामुळे अशा बनवाट फेसबुक अकाऊंट्स आणि पोस्टना बळी पडू नका असं आवाहन करण्यात येत आहे. एखाद्या सेलिब्रिटीशी संपर्क साधण्याआधी ते वैध आहे का याची खात्री करुन घ्या. त्या व्यक्तीच्या नावापुढे निळ्या रंगाचे टिकमार्क असेल तरच ते अधिकृत अकाऊंट आहे याची खातरजमा करुन घ्या. याबाबत खुद्द आकाशनेही समोर येऊन तातडीने आपल्या फॅन्सना आवाहन करण्याची गरज आहे. Also Read:'सैराट' फेम या आकाश ठोसर पडला या अभिनेत्रीच्या प्रेमात?सैराटमध्ये आकाशने साकारलेला परशा रसिकांवर जादू करुन गेला. परशा आणि आर्ची यांची केमिस्ट्रीसुद्धा रसिकांना चांगलीच भावली. त्यामुळे सैराटला  बॉक्स ऑफिसवर मिळालेल्या झिंगाट यशानंतर आकाशचा आगामी सिनेमा कोणता असेल याची रसिकांना उत्सुकता होती.त्यांनतर  सैराटमधील परशाच्या भूमिकेमुळे लगेचच आकाशला महेश मांजरेकर यांच्या एफ यू या सिनेमाची लॉटरी लागली होती.