सध्या राज्यात मराठी विरुद्ध हिंदी वाद सुरू आहे. अनेक सेलिब्रिटींनी मराठी भाषेला पाठिंबा दिला आहे. मात्र, रितेश देशमुखच्या एका व्हायरल व्हिडिओवरुन रीलस्टार आणि 'बिग बॉस ओटीटी' फेम रीलस्टारने अभिनेत्याला डिवचलं आहे. रीलस्टार पुनीत सुपरस्टारने रितेशचा तो व्हिडीओ दाखवत त्याने हिंदी भाषेचा अपमान केल्याचं म्हटलं आहे. या व्हिडिओत रितेश पापाराझींना 'मराठी की हिंदी?' असं विचारताना दिसत आहे. त्यावर पापाराझी हिंदी असं म्हणतो. त्यानंतर रितेश हाहा काय म्हणतोय, असं म्हणत निघून जात असल्याचं दिसत आहे.
रितेशच्या या व्हिडिओवरुन रीलस्टार असलेल्या पुनीत सुपरस्टारने त्याला डिवचलं आहे. तो म्हणतो, "हा अभिनेता रितेश देशमुख...आता म्हातारा झालाय. पत्रकाराने विचारल्यावर तो त्याला म्हणतो की हिंदीमध्ये बोलणार की मराठीत? पत्रकाराने हिंदीत विचारल्यावर त्याला उत्तर दिलं नाही. मला एक सांग हिंदुस्तान आणि मुंबईत असे कितीतरी लोक आहेत जे मराठी नाहीत. बंगाली, मुस्लिम, गुजराती, बिहारीही लोक आहेत. तू हिंदी बोलायला नकार दिला. ठीक आहे तू मराठी भाषेला सपोर्ट करतो. आम्हीदेखील मराठीला सपोर्ट करतो. पण, जर कोणी तुझ्यासोबत हिंदीत बोलत आहे तर तू त्याचा अपमान नाही करू शकत. आणि तुला असं किती मराठी येतं? तू स्वत: इंग्रजी माध्यमात शिकला आहेस. ख्रिश्चन मुलीशी लग्न केलंस. हा व्हिडिओ इतका शेअर करा की...हा हिंदुस्तानात राहून हिंदी भाषेचा अपमान करतोय".
या व्हिडिओवरुन रितेशच्या चाहत्यांनी पुनीतला ट्रोल केलं आहे. पुनीत त्याच्या विचित्र व्हिडीओंमुळे कायमच चर्चेत असतो. तो 'बिग बॉस ओटीटी'मध्येही सहभागी झाला होता. मात्र पहिल्याच दिवशी त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.