Join us  

छोट्या कलाकारांचा मोठा कलाविष्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2017 3:14 AM

आजवर महाराष्ट्राची संस्कृती दर्शविणारे महाराष्ट्राचं लोकसंगीत, लोकनृत्य तसेच महाराष्ट्राची परंपरा दाखवणारे अनेक रंगमंचीय आतापर्यंत सादर झाले आहेत. पण हे सर्व ...

आजवर महाराष्ट्राची संस्कृती दर्शविणारे महाराष्ट्राचं लोकसंगीत, लोकनृत्य तसेच महाराष्ट्राची परंपरा दाखवणारे अनेक रंगमंचीय आतापर्यंत सादर झाले आहेत. पण हे सर्व प्रयोग आतापर्यंत वयस्क प्रस्थापित कलाकारांनी सादर केले आहेत. आता याच धर्तीवर आर्वी थॅंक्स एंटरटेनमेंट व सिद्धान्त प्रॉडक्शन निर्मित “छोटयांची लोकधारा” हे महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारे पहिले बालनाट्य रंगभूमीवर येत असून त्याचा शुभारंभाचा प्रयोग येत्या मंगळवारी संपन्न होणार आहे.

“छोटयांची लोकधारा” हया बालनाट्याचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्राच्या विविध कार्यशाळेतून निवडलेल्या ५० गुणी बालकलाकारांनी हा संपूर्ण प्रयोग सादर केला आहे. हे सर्व कलाकार प्रथमच रंगभूमीवर पदार्पण करीत असून अत्यंत मेहनतीने आणि आत्मियतेने हया बाल कलाकारानी हे महा बालनाट्य उभे केले आहे. या नाटकाची संकल्पना, लेखन – दिग्दर्शन आणि निर्मिती रमेश अनंत वारंग यांची असून नृत्य दिग्दर्शन सावली करुळकर आणि अमृता खिसमतराव यांचे आहे. नेपथ्य संतोष नागोटकर व संगीत प्रजोत पावसकर यांचे आहे. यामध्ये महाराष्ट्रातील संस्कृती, सण, उत्सव, रूढी, परंपरा, लोकनृत्य, लोकसंगीत या सर्वांचा अतिशय कल्पकतेने मेळ घालून एक सुंदरशी कलाकृती बालकलाकारांच्या वतीने प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. बालकलाकारांनी सादर केलेला हा आविष्कार रसिकांचे पूर्व मनोरंजन करणारा तर आहेच आणि महाराष्ट्राचे दर्शन घडवणाराही आहे. त्यामुळे एक आगळी वेगळी रंजक अनुभूती देणारा हा प्रयोग प्रेक्षकांना निश्चितच आवडेल.

“छोटयांची लोकधारा” यामध्ये मानसी सतीश कासलेमानसी विलास नागोटकर, शुभम विलास नागोटकर, ऋग्वेद रविकांत पुजारे, करण अनिल पारदुले, वैदेही योगेश मेहता, सायली सुधीर करुळकर, जान्हवी अजित साळवी, निर्मिती संतोष नागोटकर, संस्कृती संतोष नागोरकर, अवंतिका रूपेश घुले, करण पवार, श्रावस्ती कांबळे, साई खरटमोल यांच्यासहित अनेक बाल कलाकारांनी हयात विविध भूमिका साकारल्या आहेत. आजच्या पाश्चिमात्य संस्कृतीकडे झुकलेल्या तरुण आणि बालपिढीला आपल्या महाराष्ट्रीय संस्कृतीची ओळख करून देणारा हा नाट्य प्रयोग सर्वांनी जरूर पहावा, असे आवाहन निर्माता – दिग्दर्शकांनी केले आहे.

रमेश वारंग हया नाट्यवेड्या धडपडया तरुणाने नाट्यसृष्टीत सतत काहींना काही करायचा चंग बांधला आहे. त्याच अनुषंगाने त्याने याआधी वेगळ्या आशयाचे एक चावट मधुचंद्र”, नेता आला रे आणि ४० वर्षावरील प्रोढांना घेऊन अभी तो हम जवान है” हया नाटकांची यशस्वी निर्मिती केली आहे. तसेच छोटा भीम आणि माय आयडॉल डॉ. अब्दुल कलाम हया दोन बालनाट्याचीही निर्मिती केली आहे. सध्या त्यांचे “ही स्वामींची इच्छा” हे नाटक जोरात सुरू असून त्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या विविध कार्यशाळेतून निवडलेल्या ५० गुणी बालकलाकारांना घेऊन “छोटयांची लोकधारा” हया नाटकाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे. हयानंतर रमेश वारंग यांची आगामी दोन नाटकं लवकरच रंगभूमीवर येणार आहेत.