Join us  

​भाऊराव कऱ्हाडे दिग्दर्शित ‘बबन’ २९ डिसेंबर रोजी होणार प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2017 11:30 AM

'ख्वाडा' या आपल्या पहिल्याच चित्रपटातून सिनेप्रेमींचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरलेले राष्ट्रीय पुरस्कार विजेते भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे आता ‘बबन’ ...

'ख्वाडा' या आपल्या पहिल्याच चित्रपटातून सिनेप्रेमींचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरलेले राष्ट्रीय पुरस्कार विजेते भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे आता ‘बबन’ हा चित्रपट घेऊन येत आहेत. बबन या चित्रपटातून एका महत्वाकांक्षी उद्योजक तरुणाची प्रेमकथा ते रंगविणार आहेत. या चित्रपटासाठी लेखन आणि दिग्दर्शन असे दुहेरी आव्हान भाऊराव कऱ्हाडे यांनी पेलले आहे. भाऊराव कऱ्हाडे हे एका सामान्य शेतकरी कुटुंबातील आहेत. ख्वाडा या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असतानाच त्यांच्या कडे असलेला पैसा संपला होता. शेवटी त्यांनी त्यांची शेतजमीन विकून या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले होते. त्यांचा चित्रपट खूपच चांगला असल्याने राष्ट्रीय पुरस्काराने त्यांच्या चित्रपटाचा सन्मान करण्यात आला. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असला तरी या चित्रपटासाठी निर्माता शोधणे भाऊराव यांच्यासाठी खूप कठीण गेले होते. त्यामुळे राष्ट्रीय पुरस्काराच्या घोषणेनंतर अनेक महिन्यांनी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. आता ख्वाडा या चित्रपटाच्या यशानंतर बबन हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. बबन या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच या चित्रपटाची चांगलीच चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. या चित्रपटातील ‘साज ह्यो तुझा’ हे अप्रतिम गाणं सोशल मीडियावर नुकतेच प्रदर्शित झाले असून या गाण्याला रसिकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या गाण्यावर अनेकजण कमेंट्स करत असून साडेतीन लाखाहून अधिक या गाण्याला लाईक्स मिळाले आहेत.‘फुल ऑन एंटरटेनमेंट’ अशा ‘बबन’ या चित्रपटाची प्रस्तुती ‘चित्राक्ष निर्मितीने’ केली आहे. ‘ख्वाडा’ फेम भाऊसाहेब शिंदे या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. त्याचसोबत गायत्री जाधव ही अभिनेत्री या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. या दोघांप्रमाणेच शीतल चव्हाण, देवेंद्र गायकवाड, योगेश डिंबळे, अभय चव्हाण, सीमा समर्थ, कृतिका तुळसकर, मृणाल कुलकर्णी यांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या २९ डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. तरल प्रेमाचे नवे आयाम मांडून प्रेमाला एका वेगळ्याच उंचीवर नेणारा 'बबन' प्रेक्षणीय ठरणार आहे हे नक्की. Also Read : ​बबन या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस