Join us

अशोक सराफ यांची प्रमुख भूमिका असलेला शेंटिमेंटल होणार लवकरच प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2017 12:21 IST

भिंतीवर टांगलेल्या महापुरुषांच्या तसबिरी, डी. एन. नगर पोलीस चौकी असा लागलेला बोर्ड, वाँटेड गुन्हेगारांचे फोटो आणि या पार्श्वभूमीवर पोलिसांची ...

भिंतीवर टांगलेल्या महापुरुषांच्या तसबिरी, डी. एन. नगर पोलीस चौकी असा लागलेला बोर्ड, वाँटेड गुन्हेगारांचे फोटो आणि या पार्श्वभूमीवर पोलिसांची लगबग हे कोणत्या पोलीस चौकीचे वर्णन नसून मुंबई येथे पार पडलेल्या ‘शेंटिमेंटल’ या चित्रपटाच्या संगीताच्या सोहळ्याचे वर्णन आहे. या चित्रपटाचा संगीत सोहळा नुकताच पार पडला.समीर पाटील लिखित दिग्दर्शित ‘शेंटिमेंटल’ या चित्रपटाद्वारे पोलिसांमधील माणसाची गोष्ट सांगण्यात येणार आहे. विषय कितीही गंभीर असला तरी त्यावर मनोरंजक पद्धतीने भाष्य करत अंतर्मुख व्हायला लावणे ही समीर पाटील यांची खासियत आहे. त्यामुळे ‘शेंटिमेंटल’ तरी याला अपवाद कसा असेल! केवळ एका वेगळ्या विषयावरचा चित्रपट एवढेच या चित्रपटाचे वैशिष्ट्य नसून समीर पाटील यांच्या लेखणीतून उतरलेले खुसखुशीत संवाद, ठेका धरायला लावणारी आणि गुणगुणत रहावी अशी गाणी या चित्रपटाचा आत्मा आहेत. ही गाणी मिलिंद जोशी, दासू वैद्य, गुरु ठाकूर यांनी लिहिली आहेत तर मिलिंद जोशी यांनी संगीतबद्ध केली आहेत. अवधूत गुप्ते, बेला शेंडे, शान, निहिरा जोशी देशपांडे, पावनी पांडे यांनी या चित्रपटातील गाणी गायली आहेत. मुंबई पोलिसांची कथा सांगणाऱ्या ‘शेंटिमेंटल’ या चित्रपटात विनोदाच्या अचूक टायमिंगद्वारे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अशोक सराफ यांची प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटाद्वारे कित्येक महिन्यांनंतर अशोक सराफ यांना प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहाता येणार आहे. अशोक सराफ यांच्यासोबतच उपेंद्र लिमये, विकास पाटील, पल्लवी पाटील, सुयोग गोऱ्हे, रघुवीर यादव, रमेश वाणी, माधव अभ्यंकर, उमा सरदेशमुख, पुष्कर श्रोत्री, राजन भिसे, विद्याधर जोशी आणि रघुवीर यादव हे कलाकार देखील वेगवेगळ्या अतरंगी भूमिकांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. Also Read : अशोक सराफ यांची प्रमुख भूमिका असलेल्या शेंटिमेंटलचा ट्रेलर लाँच