Join us  

‘सम्राट अशोक’; पण माझे ‘श्रीमान योगी’

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 7:30 AM

Ashok Saraf: अतिशय योग्य व्यक्तीला हा महाराष्ट्रातील उच्च पुरस्कार मिळणं ही अभिमानाची गोष्ट आहे. यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सांस्कृतिकमंत्री आणि अशोकच्या सर्व चाहत्यांचे खूप खूप आभारी आहे. मी खूपच भारावून गेले आहे. अशोकचा जीव त्यांच्या कलेत आहे.

- निवेदिता सराफ अतिशय योग्य व्यक्तीला हा महाराष्ट्रातील उच्च पुरस्कार मिळणं ही अभिमानाची गोष्ट आहे. यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सांस्कृतिकमंत्री आणि अशोकच्या सर्व चाहत्यांचे खूप खूप आभारी आहे. मी खूपच भारावून गेले आहे. अशोकचा जीव त्यांच्या कलेत आहे. त्यामुळे फॅन्सनीही त्यांच्यावर भरभरून प्रेम करत कायम त्यांच्या कलाकृतींना उत्तम प्रतिसाद दिला आहे. या पुरस्कारात त्यांचे सहकलाकार, दिग्दर्शक, निर्माते या सर्वांचाच वाटा आहे. अशोकना पद्मभूषण मिळावा, अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे; पण यंदा राजदत्त यांच्यासारख्या ज्येष्ठ कलावंताला पद्मभूषण पुरस्कार मिळाल्याचा खूप खूप आनंद आहे. त्या पुरस्कारासाठी दत्ताजी योग्य होते. 

अशोक यांना चाहते अभिनयातील ‘सम्राट अशोक’ म्हणतात; पण मी त्यांना ‘श्रीमान योगी’ म्हणते. कारण सगळ्यात असूनही ते सगळ्यांपासून अलिप्त राहतात. त्यांची ही वृत्तीच त्यांना इथवर घेऊन आली आहे. नट म्हणून ते चतुरस्र अभिनेते आहेत. प्रेक्षकांना जरी त्यांची कॉमेडी आवडत असली तरी त्यांनी कायम विविधांगी व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. त्यांनी कधीच माझ्यासमोर कोण, हा सीन कोणाचा, सहकलाकाराला किती फुटेज, मला किती फुटेल यांचा विचार केला नाही. सहकलाकाराच्या सीनमध्ये ते त्याला पूर्ण बॅटिंग करण्याची संधी देतातच; पण सपोर्टही करतात. ते कलाकृतीवर प्रेम करणारे मनस्वी कलाकार आहेत. ते सर्वांना सोबत घेऊन मोठे झाले. एखादी ऑडिशन सूचली तर सहकलाकाराला सांगण्याचा उदात्तपणा त्यांच्या ठायी आहे. एखाद्या माणसाचा स्वत:च्या अभिनयक्षमतेवर पूर्ण विश्वास असतो, तेव्हाच तो इतक्या निरपेक्ष भावनेने वागू शकतो. अशोकचा तसा आपल्या कलेवर आणि क्षमतेवर विश्वास आहे. त्यामुळे त्यांनी इतरांकडे किती काम आहे, याकडे कधीच लक्ष दिलं नाही. 

हिरो म्हणून काम करताना एखादी उत्तम चरित्र भूमिका आल्यास तीदेखील त्यांनी केली. हे आजच्या कलाकारांनी घेण्यासारखं आहे. एका वयात पोहोचल्यानंतर हिरो ते चरित्र भूमिका हे ट्रान्झिशन त्यांच्यासाठी खूपच सोपं गेलं. अशोकच्या प्रदीर्घ कारकिर्दीतील अमूक आवडलं हे सांगणं खूप कठीण आहे. 

अशोक खासगी आयुष्याबद्दल अवाक्षरही बोलत नाहीत. त्यामुळेच त्यांना पुस्तक काढायचं नव्हतं; पण ‘मी बहुरूपी’ हे पुस्तक काढावं हा माझा आग्रह होता. त्यांची कारकिर्द शब्दरूपात लोकांपर्यंत पोहोचवायची होती. यासाठी मी त्यांना फक्त तुमच्या कारकिर्दीबद्दल लिहू, असं सांगितलं. त्यामुळे पुस्तकात कुठेही त्यांच्या पर्सनल गोष्टी नाहीत. करिअरसोबत उलगडत जाणारं थिएटर आणि दूरदर्शनचा काळ हाच पुस्तकाचा आवाका ठेवल्याने ग्रंथालीच्या साहाय्याने पुस्तक घडू शकले. त्यांच्या पुस्तकाचं ‘मी बहुरूपी’ हे शीर्षक अगदी समर्पक आहे. कारण त्यांनी नेहमी विविधांगी भूमिकांवर भर दिला. महाराष्ट्राने या कलावंताला दिलेल्या या पुरस्काराच्या वर्णनासाठी आभार मानण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत.

टॅग्स :अशोक सराफनिवेदिता सराफ