Join us

'एप्रिल मे ९९' आता २३ मे रोजी होणार प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 13:30 IST

April May 99 Movie : 'एप्रिल मे ९९' सिनेमात कृष्णा, सिद्धेश, प्रसाद व जाई यांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीची कहाणी पाहायला मिळणार आहे,

उन्हाळ्याच्या सुट्टीची नोस्टॅल्जिक सफर घडवणारा 'एप्रिल मे ९९' (April May 99 Movie) चित्रपटाच्या टीझर व गाण्यांनी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात असतानाच  या चित्रपटाच्या प्रदर्शन ताराखेवर पुनर्विचार करण्यात आला. मात्र आता प्रेक्षकांची ही उत्सुकता अधिक न ताणता अखेर हा चित्रपट येत्या २३ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

मापुस्कर ब्रदर्स इन असोसिएशन विथ फिंगरप्रिंट फिल्म्स, नेक्सस अलायन्स, थिंक टँक आणि मॅगिज पिक्चर्स प्रस्तुत एप्रिल मे ९९ या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन रोहन मापुस्कर यांनी केले आहे. आजच्या इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या युगात सुट्ट्यांचा आनंद फक्त स्क्रीनपुरता मर्यादित राहिला आहे. मात्र एक काळ असा होता, जेव्हा ना स्मार्टफोन्स होते, ना वायफाय आणि उन्हाळ्याच्या सुट्टीचा खरा आनंद मिळायचा गावाला जाऊन मोकळ्या हवेत फिरण्यात, नदी-समुद्रावर फेरफटका मारण्यात, सायकलवर भटकंती करण्यात, सूर्य डोक्यावर येईपर्यंत झोपण्यात आणि बर्फाचे गोळे खात मजा लुटण्यात! अशीच ‘त्या’ वेळची उन्हाळ्यातील सुट्ट्यांची सफर हा चित्रपट घडवणार आहे. यात कृष्णा, सिद्धेश, प्रसाद व जाई यांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीची कहाणी पाहायला मिळणार आहे, जी प्रेक्षकांना नक्कीच आपल्या सुट्ट्यांची आठवण करून देईल.  

 राजेश मापुस्कर , मधुकर कोटीयन, योगेश भूटानी आणि मॉरिस नून ''एप्रिल मे ९९'चे  निर्माते आहेत तर सहनिर्माते लॉरेन्स डिसोझा आहेत. या चित्रपटात आर्यन मेंगजी, श्रेयस थोरात, मंथन काणेकर, साजिरी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.