Join us  

Video : आनंदी गोपाळ सिनेमांतील गाण्यांना सोशल मीडियावर तुफान पसंती, ही आहे गाण्यांची खासियत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2019 4:06 PM

भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई आणि त्यांचे पती गोपाळराव जोशी यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे.

ठळक मुद्देसिनेमात ललित प्रभाकर गोपाळरावाची भूमिका साकारतो आहेचित्रपट येत्या १५ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे

समीर विद्वांस दिग्दर्शित ‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटाच्या गाण्यांची सध्या सोशल मिडीयावर तुफान चर्चा आहे. भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई आणि त्यांचे पती गोपाळराव जोशी यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. अवखळ “वाटा वाटा”, स्फूर्तिदायक गोंधळ “माझे माऊली”, शांत तेवणाऱ्या समईसारखी सुरुवात होणारे “मम पाऊली” आणि काळजात घर करणारे “तू आहेस ना” ही चित्रपटातील विविध धाटणीची गाणी असून त्या काळातील भाषेचा गोडवा असलेली शब्दरचना गीतकार वैभव जोशी यांनी केली आहे, तर सहज, सुंदर चालीत हृषीकेश – सौरभ - जसराज यांनी संगीतबद्ध केले आहेत.

केतकी माटेगावकर, शरयू दाते, आनंदी जोशी, प्रियांका बर्वे, जसराज जोशी, ऋषिकेश रानडे, राहुल देशपांडे, अवधूत गुप्ते, आदर्श शिंदे, रोहित राऊत यांच्या सोबतीने पं. संजीव अभ्यंकर यांनी ती स्वरबद्ध केली आहेत. चपखल शब्द, अप्रतिम संगीत आणि साजेसे आवाज व गायकी हे जमून येणे म्हणजे नेमके काय याचा प्रत्यय ‘आनंदी गोपाळ’ ची गाणी ऐकून येतो.

सिनेमात ललित प्रभाकर गोपाळरावाची भूमिका साकारतो आहे तर अभिनेत्री  भाग्यश्री मिलिंद आनंदीबाई जोशींच्या भूमिकेत दिसतेय. 'ज्या देशास माझा धर्म मान्य नाही, तो देश मला मान्य नाही’, असे दमदार डायलॉगस ट्रेलरमध्ये रसिकांची मनं जिंकतायेत. गोपाळरावांनी आनंदीबाईंना मराठी, इंग्रजी आणि संस्कृत कशी लिहितात आणि वाचतात त्याचे शिक्षण दिले. आनंदीबाई यांचे वयाच्या दहाव्या वर्षी गोपाळराव जोशी यांच्याशी लग्न झाले होते. गोपाळरावांनी लग्नानंतर आनंदीबाईंना शिकविले. पुढे अमेरिकेत पाठवून त्यांचे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या हा संपूर्ण प्रवास मोठ्या पडद्यावर पाहणं रोमांचकारी ठरणार आहे. ह्या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडीओज यांनी केली असून हा चित्रपट येत्या १५ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

टॅग्स :आनंदी गोपाळललित प्रभाकर