Join us  

लंडनमध्ये चमचमीत वडापाव आणि शेवपुरीवर अमृता खानविलकर आणि पुष्कर जोगने मारला ताव

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2021 8:02 PM

अमृता खानविलकर आणि पुष्कर जोगचा आगामी चित्रपट वेल डन बेबीचे चित्रीकरण लंडनमध्ये झाले आहे.

‘वेल डन बेबी’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून हा लाईट-हार्टेड ड्रामा संपूर्ण देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. प्रियंका तन्वर दिग्दर्शित आणि अमृता खानविलकर, पुष्कर जोग, वंदना गुप्ते अभिनीत या सिनेमात घटस्फोटाच्या काठावर असलेल्या एका आधुनिक जोडप्याचा ते प्रेग्नंट झाल्यानंतरचा प्रवास दाखवते. या चित्रपटाचे बरेचसे चित्रीकरण नयनरम्य आणि गजबजलेल्या अशा लंडनमध्ये झाले आहे.  

अभिनेत्री अमृता खानविलकरने लंडनमधील चित्रीकरणाच्या आपल्या अनुभवांविषयी सांगितले. या चित्रपटाचे चित्रीकरण लंडनमधील एका गजबजलेल्या शहरात झाले आहे. लंडन मधल्या त्याच त्याच जेवणाला कंटाळून एका संध्याकाळी ते सर्व कलाकार भारतीय मसालेदार खाण्याच्या शोधात बाहेर पडले होते, त्याची एक धम्माल आठवण अमृताने शेअर केली, ती म्हणाली, “गर्भवती महिलेची भूमिका ऑन स्क्रीन करताना माझ्या वास्तविक जीवनातील आकांक्षा देखील वाढल्या. लंडनमधील चित्रीकरणाच्या दिवसांमध्ये वंदना (गुप्ते) ताई आणि मला सेटवर अगदी घराप्रमाणेच वाटत होते मात्र, या ठिकाणी चांगले चमचमीत भारतीय भोजन हवे होते. आमची ही इच्छा पुष्करने ताबडतोब पूर्ण केली. पुष्कर, एक उत्तम मनुष्य आणि तितकाच उत्तम निर्माता देखील आहे, त्याने आम्हाला ‘हॉन्स्लो’ येथील एका भारतीय रेस्टॉरंटची माहिती दिली. एवढेच नव्हे, तर तो आम्हाला आणि संपूर्ण क्रूला चाट पार्टीसाठी घेऊन गेला. तिथे आम्ही वडापाव, सेवपुरी, बटाटापुरी, थालीपीठ आणि आल्याचा चहा इत्यादी मसालेदार चमचमीत पदार्थांवर अक्षरशः तुटून पडलो होतो.”

याविषयी अधिक बोलताना, पुष्कर म्हणाला की, “लंडन ही जगातली माझी सर्वात आवडती जागा आहे आणि तिथे आमच्या आगामी चित्रपट ‘वेल डन बेबी’चे खरोखर धम्माल शुटींग मी केले आहे. खर तर, लंडन मधल्या त्या कडाडत्या हिवाळ्यात शूटिंग करणे सोपे नव्हते. आमची दिग्दर्शक प्रियंका तन्वर ही परफेक्शनिस्ट आहे आणि तिथल्या बोचऱ्या थंडीत तिने आम्हाला अनेकदा टेक्स घेण्यास उद्युक्त केले. हे आव्हानात्मक पण तितकेच मजेदार होते. अमृता आणि वंदना ताईंसोबत काम करण्याचा अनुभव खरोखर खूप चांगला होता, त्या दोघीही सेटवर नेहमीच माझी खेचत असायच्या.”

‘वेल डन बेबी’ ९ एप्रिल रोजी केवळ अमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे.

 

टॅग्स :अमृता खानविलकरपुष्कर जोग