Join us  

"ठाकरे कुटुंबाचे खूप उपकार आहेत", अजिंक्य देव यांनी सांगितली बाळासाहेबांची आठवण, म्हणाले, "शूटिंगवेळी ते सेटवर आले अन्.."

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2023 2:03 PM

"देव फॅमिलीला ठाकरे कुटुंबीयांनी खूप मदत केली", अजिंक्य देव यांनी सांगितली आठवण, म्हणाले, "मी लहानपणी बाळासाहेबांच्या मांडीवर बसून..."

मराठी कलाविश्वातील देखणा आणि रुबाबदार अभिनेता म्हणजे अजिंक्य देव. आजही वयाच्या साठीत ते तितकेच हँडसम दिसतात. ८०-९०च्या दशकात अजिंक्य देव यांनी सिनेसृष्टी गाजवली. अजिंक्य देव हे दिवंगत अभिनेते रमेश देव आणि अभिनेत्री सीमा देव यांचे पुत्र. आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनी अभिनयात पदार्पण केलं. 'माहेरची साडी', 'बाळा जो जो रे', 'कशासाठी प्रेमासाठी', 'वहिनीची माया' अशा सुपरहिट चित्रपटांतून अभिनयाचा ठसा उमटवला. मराठीबरोबरच हिंदी सिनेसृष्टीतही त्यांनी नाव कमावलं. नुकतंच अजिंक्य देव यांनी 'लोकमत फिल्मी'शी दिलखुलास संवाद साधल्या. या मुलाखतीत त्यांनी वैयक्तिक आयुष्य, करिअर यावर भाष्य करत अनेक गमतीदार किस्सेही सांगितले. 

'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत अजिंक्य देव यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबरचं नातं आणि त्यांची आठवणही सांगितली. ते म्हणाले, "मी लहानपणापासून बाळासाहेब ठाकरेंना भेटण्यासाठी आईबाबांबरोबर मातोश्रीवर जायचो. ८-९वर्षांचा असताना मी त्यांच्या मांडीवर बसलेलो आहे. त्यांचं वलय मला मोठं झाल्यानंतर कळालं, पण ते मोठे प्रस्थ आहेत हे माहीत होतं. शाब्बास सुनबाईच्या सेटवर ते आले होते. मी घोड्यावरुन येतो असा शॉट होता. माझी एन्ट्री झाली मी घोड्यावरुन उतरलो आणि त्यांनी माझ्या पाठीवर थाप दिली. तू छान घोडा चालवतोस, बापाचं नाव मोठं करशील, असं ते म्हणाले." 

"त्यांचं बोलणं फार स्फुर्तीदायक असायचं. ते मनापासून बोलायचे. त्यात प्लॅनिंग नसायचं. आज महाराष्ट्राला त्यांची खरी गरज होती. पण, मी स्वत:ला खूप भाग्यशाली समजतो. अशा लोकांचा मला सहवास लाभला. ठाकरे कुटुंबाचे आमच्यावर खूप उपकार आहेत. ते कायमच आमच्या पाठीशी उभे राहायचे. देव फॅमिलीला ठाकरे कुटुंबीयांनी नेहमीच मदत केलेली आहे," असंही अजिंक्य देव यांनी सांगितलं. 

टॅग्स :अजिंक्य देवबाळासाहेब ठाकरेमराठी अभिनेता