Join us  

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवीण तरडे यांनी संतापून केले हे ट्वीट, वाचा काय आहे त्यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 4:13 PM

काल वांद्रे येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवीण तरडे यांनी ट्वीट केले आहे.

ठळक मुद्देप्रवीण तरडे यांनी ट्वीट केले आहे की, देशाचा सगळ्यात मोठा शत्रू कोरोना नाही तर अफवा पसरवणारी भूतं आहेत .. त्यांच्या पासून लांब राहा ...

जगभरात सध्या कोरोना व्हायरसने थैमान घातले असताना भारतातही या व्हायरसचा विळखा घट्ट होत आहे. दिवसागणिक भारतात करोना संक्रमित रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. देशात सुरुवातीला २१ दिवसांचा लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला होता. आता तो वाढवून ३ मे पर्यंत करण्यात आला आहे. पण सकाळी नरेंद्र मोदी यांनी याची घोषणा केल्यानंतर संध्याकाळपर्यंत मुंबईतील आणि जवळच्या परिसरातील अनेक मजूर मोठ्या संख्येने घराच्या बाहेर पडल्याचे दिसून आले. वांद्रे स्थानकावर तर हजारोहून अधिक लोकांनी गर्दी केली होती. काही समाजकंटक सोशल मीडियाद्वारे काही अफवा पसरवत असल्यामुळे अशा गोष्टी वारंवार घडत आहेत.

मुंबईत असलेल्या मजूरांना त्यांच्या घरी परतण्याची ओढ लागलेली आहे. त्यात काही जणांनी रेल्वे सेवा सुरू होणार असल्याची अफवा सोशल मीडियाद्वारे पसरवली होती आणि त्याचमुळे मजूर मोठ्या संख्येने जमा झाले होते. खरे तर अशा अफवांना बळी पडू नका असे आवाहन लोकांना वारंवार केले जात आहे. पण लोक त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. या सगळ्या प्रकरणावर दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे यांनी सोशल मीडियाद्वारे एक आवाहन केले आहे. त्यांनी ट्वीट केले आहे की, देशाचा सगळ्यात मोठा शत्रू कोरोना नाही तर अफवा पसरवणारी भूतं आहेत .. त्यांच्या पासून लांब राहा ...

प्रवीण तरडे यांचे हे ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्याचे मत हे अगदी योग्य असल्याचे लोक कमेंटद्वारे त्यांना सांगत आहेत.

वांद्र्यात नेमकं काय घडलं? 

कोरोनाचा वाढता धोका, लॉकडाउनमुळे उपासमारीची वेळ ओढावलेले हजारो मजूर विविध अफवांमुळे मंगळवारी दुपारी वांद्रे स्थानक परिसरात जमल्याने तणाव निर्माण झाला. अखेर पोलिसांना तेथे अतिरिक्त कुमक मागवावी लागली. काही मजुरांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानं पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. दोन तासांनी ही गर्दी नियंत्रणात आली. या प्रकरणी सुमारे ८०० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वांद्रे येथे स्वयंसेवी संस्था मोफत अन्नधान्य वाटप करीत होती. हे घेण्यासाठी लोक जमले असतानाच तिथे मोठ्या प्रमाणात मजूरही जमू लागले. हीच गर्दी नंतर आम्हाला धान्य नको, गावी जाऊ द्या, असं म्हणू लागली. दुपारी तीन नंतर हा गोंधळ वाढतच गेला. हे समजताच वांद्रे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी स्थानिक नेत्यांच्या मदतीने गर्दीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. त्यात गर्दीतले काही जण हिंसक झाल्याने पोलिसांनी लाठीमार करत त्यांना घरी पाठवलं. यात प्रचंड गोंधळ उडाला. शेकडो बिगारी कामगार मूळ गावी जाण्याची व्यवस्था करण्यात यावी, या मागणीसाठी मंगळवारी दुपारी मुंब्य्रात रस्त्यावर देखील उतरले होते.

टॅग्स :प्रवीण तरडे