Join us

'सैराट'नंतर रिंकू राजगुरूमध्ये झाला कायापालट, खुद्द अभिनेत्रीनेच सांगितले या मागचे कारण

By तेजल गावडे | Updated: May 31, 2021 08:00 IST

अभिनेत्री रिंकू राजगुरूने सैराटनंतर स्वतःमध्ये खूप बदल केला आहे. त्यामुळे बऱ्याचदा ती ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.

सैराट चित्रपटाला नुकतेच पाच वर्षे पूर्ण झाले आहेत. या चित्रपटातील परशा आणि आर्चीनं प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. ही भूमिका साकारली होती आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरूने. अभिनेत्री रिंकू राजगुरूने सैराटनंतर स्वतःमध्ये खूप बदल केला आहे. आताची रिंकू आणि सैराटमधील आर्चीमध्ये चांगलाच कायापालट झाला आहे. त्यामुळेच हल्ली रिंकू राजगुरू ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. या बदलामागचे कारण नुकतेच तिने सांगितले.

रिंकू राजगुरूने सैराट चित्रपटानंतर जेव्हा सिनेइंडस्ट्रीतील जग पाहिले तेव्हा तिला स्वतःमध्ये बदल करावासा वाटला. कारण सैराट चित्रपटात काम करण्याआधी सिनेइंडस्ट्रीबद्दल माहित नव्हते. चित्रपटाच्या संपूर्ण प्रोसेसदरम्यान देखील फारसे माहित नव्हते. मात्र जेव्हा मी सैराट चित्रपटानंतर बाहेर पडले, चार लोकांना भेटायला लागले, बोलायला लागले. तेव्हा मला बदल जाणवू लागला. त्यांची बोलायची पद्धत, त्यांचे राहणीमान पाहून मला छान वाटायचे. त्यांना पाहून वाटायचे की या गोष्टी प्रत्येकाकडून शिकायला हव्यात. शिकलेले कधीच वाया जात नाही.  वाचन वाढवले, वेगवेगळे चित्रपट पाहिले. वेगवेगळ्या लोकांमध्ये वावरू लागले. कदाचित त्याच्यामुळे माझ्यात बदल होत गेले असतील.

तर फिटनेसबद्दल रिंकूने सांगितले की, फिटनेसला मी याआधी इतके महत्त्व कधीच दिलेच नव्हते. त्यावेळी आपली फिगर मेन्टेन असावी, आपण छान दिसावे असे वाटायचे नाही. जेव्हा याबद्दल जागरूक झाले त्यावेळी लक्षात आले की आपले वजन आवाक्याबाहेर चालले आहे. त्यामुळे फिटनेसकडे लक्ष दिले.

रिंकू राजगुरूच्या आगामी प्रोजेक्टबद्दल सांगायचे तर ती मराठी चित्रपट छूमंतर आणि हिंदी चित्रपट झुंड आणि हिंदी वेबसीरिज जस्टिस डिलिव्हर्डमध्ये झळकणार आहे.

टॅग्स :रिंकू राजगुरूसैराट 2