विटिदांडू या चित्रपटानंतर गणेश कदम यांचा अग्निपंख
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2017 16:34 IST
‘अग्निपंख’ या सिनेमाचा टीजर पोस्टर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला. हॉलिवूडपट वाटावा असा हा पोस्टर मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ...
विटिदांडू या चित्रपटानंतर गणेश कदम यांचा अग्निपंख
‘अग्निपंख’ या सिनेमाचा टीजर पोस्टर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला. हॉलिवूडपट वाटावा असा हा पोस्टर मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. फायर ब्रिगेडवर आधारित बिग बजेट सिनेमावर काम सुरू असल्याची चर्चा गेल्या वर्षभरापासून होती. आता हा पोस्टर पाहून या सिनेमाबद्दलची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. विटीदांडू या यशस्वी चित्रपटानंतर दिग्दर्शक गणेश कदम यांचा अग्निपंख हा ड्रीम प्रोजेक्ट आहे.महाकाय अग्नितांडव असो... भूकंप असो वा महाप्रलय मनुष्यजीवासह प्राणी-पक्ष्यांचेही जीव वाचविण्याचे कार्य अग्निशमन दल प्रतिकुल परिस्थितीतही करत असते. ऊन, वारा, पाऊस कशाचीही तमा न बाळगता अग्निशामक जवानांची अग्नी आणि जीवसुरक्षेप्रती असलेली निष्ठा वेळोवेळी अधोरेखित झाली आहे. अशा कर्तव्यनिष्ठ अग्निशमन दलाचा संघर्ष एका जबरदस्त थरारक आणि रोमांचकारी घटनेतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.अग्निशमन दलावरचा हा पहिला भारतीय ॲक्शनपट आहे. भारतातील सर्वोत्कृष्ट सिनेतंत्रज्ञांचा सहभाग ही या चित्रपटाची जमेची बाजू असणार आहे. त्यामुळे अग्निपंख मराठी प्रेक्षकांसाठी व्हीज्युअल ट्रीट ठरणार आहे, असा विश्वास दिग्दर्शक गणेश कदम यांना आहे.अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि ग्राफिक्समुळे चित्रपटाचे बजेट जास्त असले तरी कसलीही कसर बाकी न ठेवता दृश्यानुभव उच्च प्रतीचा राखण्याचा आमचा प्रयत्न आहे. अग्निशमन दलाच्या सर्वात कठीण, श्वास रोखून ठेवणाऱ्या मोहिमेचा थरार प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे, असे निर्माते रुतुजा बजाज आणि अनिल गायकवाड सांगतात.या चित्रपटात कोण कोण कलाकार असणार आहेत, या प्रश्नाचे उत्तर अजुनही गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. ‘अग्निपंख’ची कथा गणेश कदम यांची असून पटकथा सचिन दरेकर यांनी लिहिली आहे. रीतू फिल्म कट निर्मित अग्निपंख लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.