Join us  

माधुरीची निर्मित असलेल्या पंचकच्या चित्रीकरणाला आदिनाथने केली सुरुवात, अशी आहे चित्रपटाची कथा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 7:15 AM

आदिनाथने 10 तारखेपासून पंचक या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली असून या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

ठळक मुद्देपंचक या चित्रपटाची कथा कोकणातील एका गावाभोवती फिरणारी असून या चित्रपटात अंधश्रद्धा, मृत्यूविषयी असणारी भीती याविषयी दाखवण्यात येणार आहे.

आदिनाथ कोठारे सोशल मीडियावर चांगलाच ॲक्टिव्ह असतो. तो त्याच्या चित्रपटांच्या चित्रीकरणाचे, खाजगी आयुष्याचे फोटो नेहमीच सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. पंचक या त्याच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच सुरू झाले असल्याचे त्याने त्याने सोशल मीडियाद्वारे त्याच्या चाहत्यांना सांगितले आहे.

आदिनाथने 10 तारखेपासून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली असून या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आदिनाथच्या या पोस्टवर सामान्य लोकच नव्हे तर मराठीतील सेलिब्रेटीदेखील त्याला शुभेच्छा देत आहेत. बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितने काही दिवसांपूर्वी या चित्रपटाची घोषणा केली असून या चित्रपटाची ती निर्मिती करणार आहे. या चित्रपटात अंधश्रद्धेवर कॉमिक अंदाजाने भाष्य केले जाणार आहे. हा एक कॉमेडी चित्रपट असून या चित्रपटात मराठीतील अनेक प्रसिद्ध कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

माधुरीने १५ ऑगस्ट या मराठी चित्रपटाची निर्मिती केली होती. हा चित्रपट प्रेक्षकांना नेटफ्लिक्सवर पाहायला मिळाला होता. आता या चित्रपटानंतर पंचक हा तिचा दुसरा चित्रपट असून तिचे पती डॉ. श्रीराम नेने देखील या चित्रपटाचे निर्माते आहेत. या चित्रपटाची कथा कोकणातील एका गावाभोवती फिरणारी असून या चित्रपटात अंधश्रद्धा, मृत्यूविषयी असणारी भीती याविषयी दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटाविषयी माधुरी सांगते, ‘या चित्रपटाची कथा एका कुटुंबावर आधारित असून अंधश्रद्धेमुळे कशा गमतीजमती घडतात हे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट एक फॅमिली चित्रपट असून प्रेक्षकांना संपूर्ण कुटुंबासोबत पाहाता येणार आहे.

या चित्रपटाचे निर्माते डॉ. श्रीराम नेने सांगतात, पंचकची कथा अतिशय साधी असून ती लोकांना भावेल याची आम्हाला खात्री आहे. या चित्रपटाचे कलाकार, तंत्रज्ञ यांची निवड करण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतली आहे. 

पंचक या चित्रपटाचे दिग्दर्शन जयंत जठार करत असून अदिनाथसोबतच या चित्रपटात तेजश्री प्रधान, आनंद इंगळे, नंदिता पाटकर, भारती आचरेकर, विद्याधर जोशी, सतिश ओळेकर, दीप्ती देवी देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.  

टॅग्स :आदिनाथ कोठारेमाधुरी दिक्षिततेजश्री प्रधान पंचक