Join us  

"का रं देवा'मध्ये झळकणार अभिनेत्री मोनालिसा बागल, पुढच्या वर्षी होणार प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 11:47 AM

अभिनेत्री मोनालिसा बागलनं "झाला बोभाटा" या चित्रपटातून आपली छाप उमटवली होती. त्याशिवाय करंट, रावरंभा आणि भिरकीट अशा उत्तमोत्तम आगामी चित्रपटातही मोनालिसा महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसणार आहे.

कलाकार हा सर्वगुणसंपन्न असतो, म्हणजे त्यांच्यामध्ये कोणत्याही शैलीचा अभिनय उत्तम करण्याची कला असते. त्यांच्यासाठी मुख्य ध्येय असतं 'प्रेक्षकांचे मनोरंजन'. हेच ध्येय मनाशी पक्क करून, स्वतःकडून कायम कसं उत्तम सादरीकरण दिलं जाईल याकडे लक्ष देणारी अभिनेत्री जिने मराठी सिनेृष्टीत एंट्री घेतल्यावर अनेकांना तिच्या सौंदर्यावर, अभिनय कौशल्यावर प्रेम करायला भाग पाडले आणि ती व्यक्ती म्हणजे अभिनेत्री 'मोनालिसा बागल'.मोनालिसा लवकरच अजून एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

आगामी 'का रं देवा' या चित्रपटात अभिनेत्री मोनालिसा बागल झळकणार आहे. एक आदर्शमय प्रेमकथा असलेल्या या चित्रपटाचं टीजर पोस्टर लाँच करण्यात आलं असून, पोस्टरमुळे चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. येत्या ११ फेब्रुवारीला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. 

सह्याद्री फिल्म प्रोडक्शनच्या प्रशांत शिंगटे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन रंजीत दशरथ जाधव यांचं आहे. सुशांत माने, तानसेन लोकरे यांची गीतं संदीप भुरे यांनी संगीतबद्ध केली आहेत. सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे, आदर्श शिंदे, मधुर शिंदे, डॉ.नेहा राजपाल, सुप्रिया सोरटे यांच्या सुमधुर आवाजात चित्रपटातील गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहेत.

अभिनेत्री मोनालिसा बागलनं "झाला बोभाटा" या चित्रपटातून आपली छाप उमटवली होती. त्याशिवाय करंट, रावरंभा आणि भिरकीट अशा उत्तमोत्तम आगामी चित्रपटातही मोनालिसा महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसणार आहे.या चित्रपटात मोनालिसाचा नायक कोण असणार ? हे अजून गुलदस्त्यात ठेवण्यात आलं असून अभिनेते अरुण नलावडे, नागेश भोसले आणि जयवंत वाडकर अशी दिग्गज कलाकार मंडळी या चित्रपटात आपल्याला पहायला मिळणार आहेत.  

एकमेकांच्या अतिशय जवळ उभे असलेले दोघं आणि एक आदर्शमय प्रेमकथा ही टॅगलाईन पोस्टरवर दिसत आहे. तसंच वेगवेगळ्या रंगांच्या वापरामुळे प्रेमाच्या नात्यातले विविध रंगही पोस्टरवर उतरले आहेत. त्यामुळे या प्रेमकथेत काय पहायला मिळणार याचं कुतुहल निर्माण झालं आहे.