Join us  

अभिनेते श्रीरंग देशमुख यांनी सांभाळली तिहेरी जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2019 5:38 PM

चित्रपटांमधून वेगवेगळ्या पद्धतीने कुटुंबाची, त्यातल्या नात्यांची गोष्ट रुपेरी पडद्यावर आजवर अनेकदा रंगवण्यात आली आहे. आजची पिढी खूप हुशार आणि तल्लख आहे

ठळक मुद्देलेखन, निर्मिती व दिग्दर्शन अशी तिहेरी जबाबदारी अभिनेते श्रीरंग देशमुख यांनी सांभाळली आहे‘एक निर्णय स्वतःचा स्वतःसाठी’हा  चित्रपट १८ जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होत आहे

चित्रपटांमधून वेगवेगळ्या पद्धतीने कुटुंबाची, त्यातल्या नात्यांची गोष्ट रुपेरी पडद्यावर आजवर अनेकदा रंगवण्यात आली आहे. आजची पिढी खूप हुशार आणि तल्लख आहे. स्वतंत्रपणे विचार करत आजच्या पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अशाच त्रिकुटाची कहाणी ‘एक निर्णय स्वतःचा स्वतःसाठी’या चित्रपटातून आपल्या समोर येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सुबोध भावे, मधुरा वेलणकर-साटम या दोघांसोबत कुंजिका काळवींट हा नवा चेहरा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या १८ जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

यात सुबोध भावे यांनी डॉ. ईशान, मधुरा वेलणकर हिने डॉ. मुक्ता व कुंजिका काळवींट हिने मानसी ही व्यक्तिरेखा साकारली आहे. हे तिघंहीया चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत असून त्यांच्या भोवती चित्रपटाची कथा फिरते. आयुष्यातला स्वत:चा असा एक निर्णय घेतल्यानंतर या निर्णयाचा या तिघांच्या आयुष्यावर काय परिणाम होतो? हे दाखवतानाच वेगवेगळ्या वैचारिक पैलूंची मांडणी या चित्रपटात करण्यात आली आहे. 

या चित्रपटाविषयी बोलताना हे तिघंही सांगतात की, आजच्या पिढीची मानसिक अवस्था, त्यांचे विचार सिनेमात उतरविले आहेत. इतकंच नाही तर विविध पिढ्यांच्या विचारांमधील तफावतही यामध्ये खूप चांगल्या प्रकारे उतरविण्यात आली आहे. हा विषय जरी आजच्या पिढीशी निगडित असला तरी घरातील प्रत्येकाचे दृष्टिकोन आणि विचार यामध्ये दाखविण्यात आले आहेत.

स्वरंग प्रोडक्शनची प्रस्तुती असलेल्या ‘एक निर्णय स्वतःचा स्वतःसाठी’या चित्रपटात या तिघांसोबत विक्रम गोखले, सुहास जोशी, प्रदीप वेलणकर, शरद पोंक्षे, श्रीरंग देशमुख, सीमा देशमुख, मंगल केंकरे, मुग्धा गोडबोले, प्रतिभा दाते, स्वप्नाली पाटील यासारख्या नावाजलेल्या कलाकारांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे लेखन, निर्मिती व दिग्दर्शन अशी तिहेरी जबाबदारी अभिनेते श्रीरंग देशमुख यांनी सांभाळली आहे.

जयंतीलाल जैन, संतोष परांजपे, दिनेश ओस्वाल, किशोर जैन, संगीता पाटील, सुलभा देशमुख हे चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. चित्रपटातली गीतं वैभव जोशी यांनी लिहिली असून, कमलेश भडकमकर यांनी ती स्वरात बांधली आहेत. छायांकन अर्चना बोऱ्हाडें यांचे असून कलादिग्दर्शनाची जबाबदारी एकनाथ कदम यांनी सांभाळली आहे. संकलन फैझल महाडिक आणि इम्रान महाडिक यांचे असून ध्वनी आरेखन विजय भोपे यांनी केले आहे. वेशभूषा गीता गोडबोले तर रंगभूषा महेश बराटे यांनी केली आहे. निहिरा जोशी देशपांडे, ऋषिकेश कामेरकर, जयदीप वैद्य, श्रुती आठवले, अंजली मराठे यांनी यातील गाणी स्वरबद्ध केली आहेत.‘एक निर्णय स्वतःचा स्वतःसाठी’हा  चित्रपट १८ जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

टॅग्स :एक निर्णय स्वतःचा स्वतःसाठीसुबोध भावे मधुरा वेलणकर