Join us  

अभिनेता,दिग्दर्शक प्रविण तरडे पहिल्यांदाच डान्स करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 11:19 AM

भाईटम साँग आहे, नुकतेच ते सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आले असून नेटकऱ्यानी मोठ्या प्रमाणावर पसंती देत व्हायरल केले आहे.

मराठी, हिंदी चित्रपटामध्ये आपण अनेकदा आयटम साँग बघितले आहे,  त्यात अनेक नृत्यांगना, सुंदर अभिनेत्री डान्स करताना दिसतात क्वचित प्रसंगी अभिनेत्यांनी आयटम नंबर केल्याचे बॉलीवूड मध्ये उदाहरणे आहेत. मात्र तुम्ही कधी ‘भाईटम सॉंग’ बघितले आहे का? प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटात ‘अराररारा अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘ हे  भाईटम साँग आहे, नुकतेच ते सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आले असून नेटकऱ्यानी मोठ्या प्रमाणावर पसंती देत व्हायरल केले आहे.

अभिजित भोसले जेन्यूइन प्रॉडक्शन्स एलएलपी आणि पुनीत बालन एंटरटेनमेंट प्रा. लि. यांची निर्मिती असलेल्या ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ता अभिजित भोसले जेन्यूइन प्रॉडक्शन्स एलएलपी आणि किरण दगडे पाटील प्रॉडक्शन्स आहेत.आयटम साँगच्याच धर्तीवर बनलेल्या भाईटम साँगची खासियत म्हणजे यात शहरातील सगळ्यात मोठ्या भाईचा वाढदिवस असतो आणि त्या दिवशीच्या जल्लोषावर आधारलेले हे गाणे आहे, त्यामुळे या गाण्यास खास भाई स्टाईल डान्स बघायला मिळतो.

आजवर प्रवीण तरडे हे लेखक, अभिनेता, दिग्दर्शक म्हणून सर्वांना परिचित आहेत. पण या भाईटम साँगच्या निमित्ताने पहिल्यांदाच त्यांचा डान्स चाहत्यांना दिसणार आहे. या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन उमेश जाधव यांनी केले असून नरेंद्र भिडे यांनी गाण्याला संगीत दिले आहे. आजवर अतिशय सौम्य शब्दांची गाणी लिहिणाऱ्या प्रणीत कुलकर्णी यांनी ‘अराररारा अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘ हे गीत लिहिले असून आदर्श शिंदे यांनी अफलातून गायले आहे.

चित्रपटातील हे गाणे मनोरंजन करणारे असले तरी ‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट शेतकऱ्यांच्या मुलभूत प्रश्नावर भाष्य करताना महानगर आणि लगतच्या गावातील गुन्हेगारीचे भीषण वास्तव मांडणारा व वास्तववादी स्थिती मांडणारा आहे. 

करिअरच्या सुरूवातीला प्रविण तरडेने ‘कुंकू ‘ ह्या मालिकेसाठी त्यानं तब्बल एक हजार भागांचं लिखाण केलं आणि ही मालिका सुपरहिट ठरली.  पुढे ‘पिंजरा’, ‘अनुपमा’, ‘दिल्या घरी तू सुखी रहा’, ‘मेंदीच्या पानावर’, ‘तुझं माझं जमेना’, ‘असं हे कन्यादान’ अशा अनेक यशस्वी मालिका प्रवीणने लिहिल्या. अनेक चित्रपटातून त्यानं छोट्या पण उल्लेखनीय भूमिकाही केल्या. ‘चिनू’ , ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘तुकाराम’, ‘मसाला’, ‘रेगे’, ‘कोकणस्थ’ ह्या चित्रपटातील त्याच्या भूमिका प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिल्या.

मालिकेनंतर चित्रपटाच्या लेखनाचं आणि दिग्दर्शनाचं – शिवधनुष्य त्यानं उचललं. ‘देऊळबंद ‘ ह्या मराठी चित्रपटासाठी लेखन, दिग्दर्शन आणि आपल्या अभिनयानं त्यानं मराठी चित्रपट सृष्टीला ‘देऊळबंद’ सारखा सुपरहिट चित्रपट दिला. देऊळबंद च्या व्यतिरिक्त इतरही अनेक प्रसिद्ध चित्रपटाचं लेखण प्रवीणनं केले आहे.