अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री हृता दुर्गुळे ही जोडी 'आरपार' या सिनेमातून पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र येणार आहे. रोमँटिक कथा असलेल्या या सिनेमात ललित व ऋता यांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळणार आहे. ‘प्रेमात अधलं मधलं काही नसतं', याचे वर्णन दर्शविणारा हा सिनेमा आहे. नुकतंच 'आरपार' सिनेमातलं पहिलं गाणं 'जागरण गोंधळ' भेटीला आलं आहे. विशेष म्हणजे या गाण्यात लोककला अभ्यासक गणेश चंदनशिवेंचा आवाज दिसतोय. जाणून घ्या.
'आरपार' सिनेमातील पहिलं गाणं
'आरपार' सिनेमातील जागरण गोंधळ गाण्यात दिसतं की, ललित प्रभाकर या गाण्यात देवीचा जागरण गोंधळ करताना दिसतो. त्याचवेळी समजतं की ललित आणि हृता दुर्गुळेचं ब्रेकअप झालंय. त्यामुळे देवीच्या उत्सवात ललितला वारंवार हृताची आठवण येत असते. त्यामुळेच तो दुःखात बेभान होऊन नाचताना दिसतो. ती गेल्यावरही जेव्हा तिच्या आठवणी सोडत नाहीत.. तुटलेलं हृदय करतंय देवीचा धावा.., असं कॅप्शन देत हे गाणं शेअर करण्यात आलं आहे. हे गाणं रिलीज होताच प्रेक्षकांना हे गाणं चांगलंच आवडलेलं दिसतंय.
'लिऑन्स मीडिया प्रॉडक्शन एलएलपी' प्रस्तुत, निर्माते नामदेव काटकर, रितेश चौधरी निर्मित 'आरपार' हा सिनेमा आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद या धुरा गौरव पत्की यांनी सांभाळल्या आहेत. प्रेमाची अनोखी परिभाषा मांडणारा हा रोमँटिक सिनेमा हृता व ललित या नव्या जोडीसह १२ सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात ललित-हृतासोबत माधव अभ्यंकर, सुहिता थत्ते, स्नेहलता वसईकर या कलाकारांच्याही प्रमुख भूमिका आहेत.