Join us
Daily Top 2Weekly Top 5

मराठी रुपेरी पडद्यावर रंगणार 2 राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या कलाकारांची जुगलबंदी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2017 12:49 IST

मराठी चित्रपटसृष्टीत दिवसेंदिवस दर्जेदार आणि आशयघन सिनेमांची निर्मिती होत आहे. वेगळ्या धाटणीचे आणि वेगळा विषय असलेले मराठी सिनेमा रसिकांच्या ...

मराठी चित्रपटसृष्टीत दिवसेंदिवस दर्जेदार आणि आशयघन सिनेमांची निर्मिती होत आहे. वेगळ्या धाटणीचे आणि वेगळा विषय असलेले मराठी सिनेमा रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहेत. सिनेमा हिट होण्यासाठी त्याच्या कथेसोबतच इतर गोष्टीही तितक्याच गरजेच्या असतात. कथेसह तांत्रिक बाबीही तितक्याच महत्त्वाच्या असतात. शिवाय या सिनेमाच्या कलाकारांची टीमही तितकीच महत्त्वाची असते. दिग्दर्शकाच्या मनातील गोष्टी पडद्यावर साकारण्याचं काम दर्जेदार कलाकार मोठ्या खुबीने करतात. त्यामुळे सिनेमासाठी उत्तम कलाकारांची फौजही तितकीच गरजेची असते. अशाच दमदार कलाकारांची जुगलबंदी आगामी हॅपी बर्थडे या मराठी सिनेमातही पाहायला मिळणार आहे. हे कलाकार निव्वळ अभिनेता नसून ते राष्ट्रीय पुरस्कार विजेते कलाकार आहेत. हॅपी बर्थडे या सिनेमात अभिनेता अरुण नलावडे आणि अभिनेता शशांक शेंडे भूमिका साकारत आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने अरुण नलावडे आणि शशांक शेंडे पहिल्यांदाच एकत्र येत असून मराठी कलाकारांना दोघांच्या अभिनयामधील जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. अरुण नलावडे यांच्या श्वास या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते. श्वास या सिनेमाचे ते सहनिर्माते होते. शिवाय श्वास सिनेमात अरुण नलावडे यांनी महत्त्वाची भूमिकाही साकारली होती. अभिनेता शशांक शेंडे यांच्या रिंगण या सिनेमालाही राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तसंच शशांक शेंडे यांची प्रमुख भूमिका असणा-या ख्वाडा या सिनेमालाही राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. दोन्ही कलाकार दर्जेदार भूमिका साकारण्यासाठी प्रसिद्ध आहेत. हॅपी बर्थडे या सिनेमाची कथा ही एका 16 वर्षीय मुलाची कथा आहे. हा मुलगा थॅलेसिमिया या आजाराने ग्रस्त असतो अशी या सिनेमाची कथा आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन नारायण गोंडाळ यांनी केले आहे. हा सिनेमा 24 नोव्हेंबरला रसिकांच्या भेटीला येणार आहे.