सोनेरी जादुई छडी हातात घेऊन सोनपरी म्हणून रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारी, अगदी लहान मुलांचीसुद्धा फेव्हरेट अभिनेत्री म्हणजे मृणाल कुलकर्णी. मृणालने हिंदी-मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये कामे करून तिच्या अभिनयाचा ठसा उमटविला. अवंतिका या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली मृणाल सर्वांचीच लाडकी बनली अन् पाहता पाहता छोटा पडदादेखील तिने काबीज केला. अभिनयानंतर मृणाल थेट वळली ते दिग्दर्शनाकडे, २०१४ साली प्रदर्शित झालेल्या रमा-माधव या चित्रपटाचे दिग्दर्शन तिने केले होते. मृणालचा हा अभिनेत्री ते दिग्दर्शक असा मराठी चित्रपटसृष्टीतील प्रवास कौतुकास्पदच आहे. म्हणूनच लोकमत सीएनएक्सने मृणाल कुलकर्णी यांच्यासोबत सेलीब्रिटी रिपोर्टरच्या माध्यमातून त्यांच्याशी केलेली ही खास बातचीत...मराठी चित्रपट ग्लोबल झाले पाहिजेत. आपले चित्रपट जर जगभरातील प्रेक्षकांनी पाहावे, असे आपल्याला वाटत असेल, तर त्याला जागतिक रूप येणे महत्त्वाचे आहे. आपण सिनेमांचे मार्केटिंग जागतिक पातळीपर्यंत करणे आवश्यक आहे. आज यू-ट्यूब, इंटरनेटच्या माध्यमातून सिनेमा ग्लोबल होतोय, आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचतोय; परंतु सिनेमा जगभरात पोहोचण्यासाठी आपण नक्कीच अधिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. मराठी चित्रपटांमधील विषय हे नक्कीच वेगळे असतात. त्यामुळे प्रेक्षकवर्गदेखील विखुरला गेला आहे. आपल्या मराठी नाटक आणि सिनेमांना वेगळी परंपरा आहे. नाटक अन् सिनेमांचे विषय हे वेगवेगळे आहेत. त्यामुळे प्रेक्षक त्यांना काय आवडतेय, तेच पाहतात. ग्रामीण भागात एक तर थिएटर्सची उपलब्धता कमी आहे. त्या समस्येवर आपण विचार करायला पाहिजे. खेड्यापाड्यात, ग्रामीण भागात सिनेमा पोहोचवायचा तर तो दाखविणार कु ठे, हा प्रश्न आहेच. शिवाय ग्रामीण भागातील प्रेक्षकांची टेस्ट बदलणे गरजेचे आहे. त्यांना वेगळ्या विषयांवरील चित्रपट अपेक्षित असतात. परंतु आता बदलत्या काळानुसार मराठी सिनेमा बदलतोय अन् वेगळे विषय आपल्याक डे येत आहेत. त्याचप्रमाणे ग्रामीण प्रेक्षकही चेंज होताना दिसतात. त्यामुळे आता सिनेमा ग्रामीण भागातही लवकरच पोहोचेल, यात शंका नाही.- शब्दांकन : प्रियांका लोंढे
मराठी सिनेमाने ग्लोबल व्हावे
By admin | Updated: March 5, 2016 01:23 IST