Join us  

'लोक बघून न बघितल्यासारखं करतात'; प्रिया बेर्डेंनी सांगितला पुरस्कार सोहळ्यातील अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 1:07 PM

Priya berde: पुरस्कार सोहळ्यांमध्ये कलाकार मंडळी एकमेकांशी कसं वागतात यावर प्रिया बेर्डे यांनी प्रकाश टाकला आहे.

मराठी कलाविश्वाचा एक काळ गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्रिया बेर्डे (Priya berde). अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant berde) यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डे यांनी मोठ्या धीराने त्यांचा संसार सांभाळला. इतकंच नाही तर आजही त्यांनी त्यांचं करिअर सांभाळून मुलांना त्यांच्या पायावर उभं केलं. त्यामुळे त्यांच्याविषयी चाहत्यांच्या मनात अपार आदर आणि प्रेम आहे. मात्र, अनेक सुपरहिट सिनेमा देणाऱ्या या अभिनेत्रीने नुकतंच पुरस्कार सोहळ्यात कलाकारांचं वागणं कसं असतं हे सांगितलं.

अलिकडेच त्यांनी 'सकाळ'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी इंडस्ट्रीतील काही जण कशाप्रकारे अॅटिट्यूडने वागतात हे सांगितलं. सोबतच पूर्वीचा काळ आणि आताचा काळ यांच्यातील फरकही त्यांनी सांगितला.

"इंडस्ट्रीतील कार्यक्रमांमध्ये नवीन लोकांचा परिचय होतो. पण, आजकाल आपणहून कोणी बोलल्याशिवाय लोक बोलत नाहीत. आधी तसं नव्हतं. तुम्ही इंडस्ट्रीत काम केलं आहे. तर तुम्हाला ओळख करुन द्यायची नसते. पण, मग ते सांगावं लागतं की, नमस्कार, मी प्रिया बेर्डे वगैरे..मग तेदेखील त्यांची ओळख सांगतात. मात्र, मला वाटतं या सगळ्याची काय गरज आहे. काही वेळा असंही होतं की बघून न बघितल्यासारखं करणं, ओळख न दाखवणं या सगळ्या गोष्टी अलिकडे खूप वाढल्या आहेत. पण ठीक आहे. जग बदलतंय. अॅटिट्यूड बदलला आहे. स्वत:कडे पाहण्याचा आणि लोकांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. त्यामुळे मी सुद्धा स्वत: मध्ये तसे बदल करुन घेतले आहेत," असं प्रिया बेर्डे म्हणाल्या.

पुढे त्या म्हणतात, "इंडस्ट्री खूप लहान आहे. त्यामुळे अॅटिट्युड दाखवण्यात काहीच अर्थ नाहीये. या सगळ्याची गरजच नसते.  प्रेक्षक आपल्यावर प्रेम करत असतात. तिथूनच आपल्याला सगळं मिळत असतं. त्यांच्यामुळे आपण मोठं होत असतो. आपल्याच इंडस्ट्रीमध्ये आपण असं का वागतो तेच मला कळत नाहीत. माणसं जोडणं खूप महत्वाचा आहे."

दरम्यान, प्रिया बेर्डेंनी मराठी सिनेसृष्टीचा एक काळ गाजवला आहे. आजवरच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. यात अशी ही बनवाबनवी, एक गाडी बाकी अनाडी, जत्रा, डम डम डिगा डिगा यांसारख्या कित्येक सिनेमांचा समावेश आहे. 

टॅग्स :प्रिया बेर्डेसेलिब्रिटीसिनेमालक्ष्मीकांत बेर्डे