Join us  

"आईबाबांना ऐकू बोलता येत नाही हे कळलं तेव्हा..." असं गेलं मराठी अभिनेत्रीचं बालपण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2023 4:06 PM

जसा माझा जन्म झाला त्यानंतर हळूहळू मला कळायला लागलं की आपले आई बाबा थोडे वेगळे आहेत.

'रुंजी' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री पल्लवी पाटील (Pallavi Pati). तिचं बालपण इतरांपेक्षा खूपच वेगळं होतं. कारण तिच्या आईवडिलांना ऐकू आणि बोलता येत नाही. होय पल्लवीने तिच्या आयुष्याबद्दलच्या अनेक गोष्टी प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील 'त्या नंतर सगळंच बदललं' या शोमध्ये उघड केल्या आहेत.

पल्लवी सांगते, "माझं बालपण खूप वेगळं होतं वेगळं आहे. माझ्या आईबाबांना दोघांनाही ऐकू बोलता येत नाही. लहानपणापासूनच मीच त्यांची पालक होते.अगदी संवाद म्हणा, किंवा घरातली छोटी छोटी कामं, जसा माझा जन्म झाला त्यानंतर हळूहळू मला कळायला लागलं की आपले आई बाबा थोडे वेगळे आहेत. आणि आता आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्यामुळे आईबाबांप्रती माझा ती सुरक्षेची भावना नेहमीच अॅक्टिव्ह असायची. मग अगदी रस्त्याने चालताना मी गाड्यांच्या बाजूना चालेन."

पल्लवी पुढे म्हणाली,"मला खूप वर्ष बोलता येत नव्हतं. माझ्या आईबाबांनी पळून लग्न केलेलं असल्याने आमच्या घरात फक्त आम्ही तिघंच होतो. कोणी बोलणारी व्यक्तीच नव्हती.त्यामुळे माझ्या कानावर शब्द पडतील असं काही घडतंच नव्हतं. मला आठवतंय माझे वडील नेव्हीमध्ये होते आणि त्यांना त्यावेळी ७०० रुपये पगार होता. त्यांनी पैसे जमवून टीव्ही घेतला आणि मला टीव्हीसमोर बसवायचे. मी टीव्ही बघून कानावर शब्द पडतील आणि मी बोलायला लागेन हा त्यामागचा हेतू होता. तर त्यांनी खरंच अफाट कष्ट घेतलेत."

घटस्फोटानंतर सगळं बदललं

पल्लवी पाटीलने 2016 मध्ये अभिनेता संग्राम समेळसोबत लग्नगाठ बांधली होती. मात्र त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही आणि ते वेगळे झाले. यावर पल्लवी पॉडकास्टमध्ये म्हणाली,"मला लग्नानंतर त्या घरात अॅडजस्ट होता आलं नाही. कारण मी वेगळ्या वातावरणात लहानाची मोठी झाले होते. मी आईवडीलांची काळजी घ्यायचे, कर्तीधर्ती मीच होते. तरी मी खूप प्रयत्न केला पण एका पॉइंटला मी हार मानली आणि घटस्फोट घेतला. परत मी आईबाबांजवळ येऊन राहू लागले तेव्हा मला छान वाटलं."

टॅग्स :मराठी अभिनेतापल्लवी पाटीलपरिवार