Join us  

हिंदी मालिकेच्या सेटवर निवेदिता सराफ यांना आलेला वाईट अनुभव, म्हणाल्या, "मी रडत घरी आले आणि..."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 1:33 PM

निवेदिता सराफ यांनी शेअर केला हिंदी मालिकेच्या सेटवरील अनुभव, म्हणाल्या...

निवेदिता सराफ या मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री आहेत. 'अशी ही बनवाबनवी', 'बाळाचे बाप ब्रह्मचारी', 'धुमधडाका', 'फेका फेकी' अशा चित्रपटांतून काम करुन त्यांनी ९०चा काळ गाजवला. मराठीबरोबरच त्यांनी हिंदी मालिका आणि चित्रपटांमध्येही काम केलं आहे. निवेदिता यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत करिअरच्या सुरुवातीच्या काळातील हिंदी मालिकेच्या सेटवरील अनुभव सांगितला. 

नवरात्रोत्सवानिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत निवेदिता सराफ यांनी त्यांच्या आईबद्दल भाष्य करताना हिंदी मालिकेच्या सेटवर आलेला अनुभव शेअर केला. त्या म्हणाल्या, "मी ये जो है जिंदगी नावाची हिंदी मालिका करत होते. तेव्हा उत्तरेकडील लोकांचं या क्षेत्रावर वर्चस्व होतं. पंजाबी पद्धतीने हिंदी बोललेलं त्यांना चालायचं. हिंदी जरी राष्ट्रभाषा असली, तरी आपलं हिंदी हे मिश्रित आहे. गुजरातमधील लोक गुजरात मिश्रित तर बंगाली लोक त्यांच्या पद्धतीने हिंदी बोलतात. महाराष्ट्रीयन लोकांच्या हिंदी बोलण्यात थोडासा मराठी भाषेचा लहेजा येतोच." 

"तेव्हा महाराष्ट्रीयन लोकांकडे यांना काय हिंदी येतं, अशा रितीने पाहिलं जायचं. ती मालिका करताना मला अनेक अडचणी आल्या. माझ्या उच्चारांवरुन टीका केली जायची. चेष्टा, मस्करी केली जायची. एके दिवशी मी रडत घरी गेले होते. आणि मी उद्यापासून जाणार नाही, असं आईला म्हणाले. त्यावर ती मला म्हणाली की मालिका सोडणं, हे खूप सोपं आहे. तुला अपमान झाल्याचं वाटतंय तर तू त्याला उत्तर दे. तुला हिंदी येत नाही, असं त्यांना वाटतंय. तर, तू शिकून दाखव. त्यानंतर मग मी उर्दू शिकले. आणि त्याच ग्रुपबरोबर मोरूची मावशीचं उर्दू नाटक मी केलं," असंही त्यांनी सांगितलं. 

दरम्यान, अशोक सराफ यांच्याबरोबर लग्नगाठ बांधल्यानंतर निवेदिता यांनी कामातून ब्रेक घेतला होता. त्या बराच काळ रुपेरी पडद्यापासून दूर होत्या. त्यानंतर आता त्या पुन्हा सक्रिय झाल्या आहेत. 'अग्गबाई सासूबाई' मालिकेनंतर आता त्या 'भाग्य दिले तू मला' मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. 

टॅग्स :निवेदिता सराफमराठी अभिनेतामराठी चित्रपटटिव्ही कलाकार