'गैरी', 'टाईमपास 3' फेम मराठमोळी अभिनेत्री कृतिका गायकवाड (Krutika Gaikwad) गंभीर आजाराचा सामना करत आहे. गरोदर असल्यासारखं तिचं पोट फुगलेलं दिसत आहे. मात्र ती गरोदर नाही तर एका गंभीर आजाराचा सामना करत असल्याचं तिने लिहिलं आहे. हा नेमका काय आजार आहे याबद्दल तिने जनजागृतीही केली आहे. कृतिकाला सर्वांनी लवकर बरी हो अशा शुभेच्छा दिल्या आहेत.
कृतिकाला नक्की काय झालंय? कृतिकाने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. यात तिचं पोट गरोदर असल्यासारखं फुगलेलं दिसत आहे. याबद्दल सांगताना तिने लिहिले, "नाही मी गरोदर नाही. हे युटेरिन फायब्रॉईड्स (Fibroids) आहेत. गर्भाशयात तयार झालेल्या या गाठी आहेत. या गाठी म्हणजे कॅन्सर नाही. तसंच या गाठी असणाऱ्या सर्वच महिलांना लक्षणं दिसतील असंही नाही. ज्यांना लक्षणं दिसतात त्यांना मात्र वेदना असह्य होतात. काहींना पोटात वेदना होतात तर काहींना पाळीत जास्त रक्तस्त्राव होतो. काही वेळेस याची वाढ झालेलीही डोळ्यांना कळत नाही. द्राक्षाच्या किंवा त्याहून मोठ्या आकाराची ही वाढ असते. तर एखादी गाठ एवढी मोठी असते की ती गर्भाशयाचा आतील आणि बाहेरील भागाला हानी पोहोचवते.अगदीच गंभीर केसेस मध्ये या गाठी पेल्विस आणि पोटापर्यंतही वाढतात. यामुळे तुम्ही गरोदर असल्यासारखंही वाटू शकतं. कृपया महिलांनो लक्ष द्या. हे हातून निसटण्याच्याआधीच रेग्युलर चेकअप करत राहा."