शशांक केतकरने काही महिन्यांपूर्वी फिल्मसिटीतील अस्वच्छतेचा व्हिडीओ सर्वांना दाखवला होता. आता पुन्हा एकदा शशांकने व्हिडीओ करुन फिल्मसिटीतील घाणीचं साम्राज्य दाखवलं आहे. शशांक म्हणाला की, "फिल्मसिटी Entrance कधीच मला Disappoint करत नाही. कचरा उचलणाऱ्या या मातेला आणि उकीरड्यावर असलेल्या या राज्यमातेला माझा नमस्कार. यांना वंदन करुन आपण थोडं आत जाऊया आणि बघूया आणखी थोडा कचरा. फिल्मसिटीच्या ओल्या कचऱ्याच्या या पेट्या आहेत पण त्यात सर्व प्लास्टिक आहे. कदाचित या प्लास्टिकच्या पिशव्या ओल्या असतील."
शशांकने दाखवली दयनीय परिस्थिती
शशांक पुढे म्हणतो की, "कचरा बघितलात? हास्यास्पद आहे ना.. मागच्यावेळी मी फिल्मसिटीचा एक व्हिडीओ टाकला होता आणि त्या व्हिडीओनंतर BMC ने त्याची दखलही घेतली. तिथला तो परिसर स्वच्छही केला. पण त्यानंतर फिल्मसिटीमध्ये मी किमान १५ वेळा तरी आलो असेन. परिस्थिती जैसे थेच आहे. त्याच स्पॉटवर पुढच्या दिवसापासून तसाच कचरा जमलेला असतो. खूप वाट पाहिली पण काहीच फरक पडला नाही. म्हणून आजचा हा पुन्हा व्हिडीओ करतोय.
"BMC तुम्हाला प्रॉब्लेम लक्षात येतोय ना, तोंडदेखलं फक्त आम्ही कचऱ्याच्या पेट्या ठेवल्यात इतकं बोलून मोकळं होऊ नका. आपल्यासमोरचं संकट खूप मोठं आहे. आपली लोकसंख्या खूप आहे. त्यामुळे कचरा खूप जास्त निर्माण होणारेय. खूप घाणेरडी ठिकाणं असणार आहेत. त्यामुळे तितक्या कचऱ्याच्या पेट्या आणि तितकी डेडीकेटेड कचरा गोळा करण्याची ठिकाणं आता असाइन करा.मला माहितीये तुम्ही म्हणाल की, रस्त्यावर मुलुंड-गोरेगाव लिंक रोडचं काम सुरु आहे. आजूबाजूला रिडेव्हलपमेंटचं काम सुरु आहे. परंतु ही कारणं आम्ही आता खपवून घेणार नाही. त्यामुळे आवरा ते. "
या व्हिडीओखाली शशांकने कॅप्शन लिहिलंय की, मला कल्पना आहे की हे एकच ठिकाण नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात असे हजारो spots आहेत जिथे कचरा जमलेला असतो. बदलाची सुरवात ही छोट्या छोट्या actions मधूनच होत असते. जर BMC आणि कचरा टाकणारी जनता निर्लज्ज आहे तर मग मलाही निर्लज्जा सारखं हे पुन्हा पुन्हा निदर्शनास आणून द्यावं लागणार. मी video बघणाऱ्या जनतेलाही हेच सांगेन… सहन करू नका!!! कचरा दिसेल तिथे video shoot करून तुमच्या महानगरपालिकेला tag करा! निदर्शनास आणून द्या. माझं मत वाया गेलं नसेल, अजूनही देश सुधारेल …अशी आशा करतो… सगळे मिळून प्रयत्न करूया स्वच्छ देश घडवूया."