Join us  

‘हसता हा सवता’: प्रियदर्शन जाधवचं नवं नाटक लवकरच रसिकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 7:58 PM

Priyadarshan jadhav: अभिराम भडकमकर लिखित आणि कुमार सोहोनी दिग्दर्शित नवीन नाटक रंगभूमीवर

 नवनवीन कलात्मक अनुभूती निर्माण व्हाव्यात आणि नव्या जाणीवा असलेला प्रेक्षक घडावा या हेतूने आशय–विषयाची नवता घेऊन नवनवीन नाटकं सध्या रंगभूमीवर येऊ घातली आहेत. यामध्येच मनोरंजनासोबत विचार करायला प्रवृत्त करायला लावणारं असचं एक वेगळ नाटक रंगभूमीवर लवकरच रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिराम भडकमकर लिखित आणि कुमार सोहोनी दिग्दर्शित ‘हसता हा सवता’ या नव्या नाटकाचा लवकरच प्रारंभ होणार आहे.

१७ जून रोजी विलेपार्ले येथील दीनानाथ नाट्यगृहामध्ये या नाटकाचा शुभारंभ होणार आहे. मोरया थिएटर्स निर्मित आणि वेदांत एण्टरटेन्मेंट प्रकाशित या नाटकात प्रियदर्शन जाधव मध्यवर्ती भूमिकेत असून त्याच्यासोबत अमोल बावडेकर, अश्विनी जोशी, श्रद्धा पोखरणकर, प्रसाद दाणी हे कलाकार रंगमंचावर वावरताना दिसणार आहेत. या नाटकाची निर्मिती भाऊसाहेब भोईर यांनी केली असून सुत्रधार भैरवनाथ शेरखाने आहेत.

या नाटकाची संकल्पना महात्मा फुले यांच्या एका वाक्यावर आधारलेली आहे. एकमेकांवर ‘मालकी हक्क’ गाजवण्यापेक्षा प्रेम करू असा विचार यात मांडण्यात आला आहे. कौटुंबिक आशय, फँटसी पद्धतीने मांडत लेखक अभिराम भडकमकर आणि दिग्दर्शक कुमार सोहोनी ही जोडगोळी ‘हसता हा सवता’ या नाटकातून प्रेक्षकानां काहीतरी वेगळं देणार हे नक्की.

काय आहे या नाटकाचं वैशिष्ट्य?

या नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे कुमार सोहोनी यांच्या दिगदर्शनाची ४९वर्षे पूर्ण झाली असून ५०व्या वर्षातले हे पहिलेच नाटक आहे. नुकताच सांस्कृतिक विभागाचा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. बऱ्याच वर्षांनी ते विनोदी नाटकाचे दिग्दर्शन करत आहेत. नाटकाची प्रकाशयोजना ही त्यांचीच आहे. तर, पुरुषोत्तम बेर्डे यांनी संगीत दिलं आहे. तसंच नेपथ्याची जबाबदारी बाबा पार्सेकर यांनी घेतली आहे. अभिनेता प्रियदर्शन जाधवचं हे २५ वं नाटकं आहे. एकंदरीतच विषयापासून ते सादरीकरणापर्यंत चांगली भट्टी असल्यामुळे ‘हसता हा सवता’ हे नाटक प्रेक्षकांचे दिलखुलास मनोरंजन करेल असा विश्वास नाटकाच्या संपूर्ण टीमने व्यक्त केला आहे.

टॅग्स :नाटकप्रियदर्शन जाधवसेलिब्रिटी