झी मराठीवरील 'देवमाणूस' मालिका चांगलीच गाजली. या मालिकेत डॉक्टरची प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेता किरण गायकवाडने त्याच्या रिलेशनशीपचा खुलासा करुन सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का दिलाय. किरणने प्रेमाची कबुली दिली असून एका सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीसोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलाय. वैष्णवी कल्याणकर असं किरणच्या गर्लफ्रेंडचं नाव असून ती सुद्धा एक अभिनेत्री आहे.
किरणने खास कॅप्शन देऊन केला खुलासा
किरण गायकवाडने वैष्णवीसोबतचा खास फोटो शेअर करुन कॅप्शन लिहिलंय. किरण लिहितो,"“तू काही संगीतकार नाहीस आणि गायक पण नाहीस;पण तरीही मी संपूर्ण आयुष्य तुझ्या चालीवर चालायच ठरवलं आहे “ मंत्रिमंडळल्या बैठका होत राहतील ,मंत्री पद वाटत राहतील ,त्यांचं ठरतय तोपर्यंत आपलं ठरलेलं सगळ्यांना सांगून टाकतो… ही आहे माझी होणारी “होम मिनिस्टर” !" याशिवाय #SheSaidYes #ForeverYours #NewBeginnings असे हॅशटॅग वापरुन किरणने प्रेमाची कबुली दिलीय.
किरण आणि वैष्णवी रिलेशनशीपमध्ये
किरणची गर्लफ्रेंड वैष्णवी कल्याणकर सुद्धा अभिनेत्री असून तिने 'तू चाल पुढं', 'देवमाणूस 2' अशा मालिकांमध्ये अभिनय केलाय. वैष्णवी सध्या 'तिकळी' मालिकेत अभिनय करतेय. वैष्णवी आणि किरण गायकवाडने सोशल मीडियावर रिलेशनशीपचा खुलासा केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून सोशल मीडियावर दोघांचं चाहत्यांनी अभिनंदन केलंय. किरण आणि वैष्णवी साखरपुडा आणि लग्न कधी करणार, याची चाहत्यांना उत्सुकता आहे.