Bhushan Pradhan : भूषण प्रधान (Bhushan Pradhan) हा मराठी कलाविश्वातील नावाजलेला अभिनेता आहे. आपल्या दमदार अभिनयाने त्याने सिने-रसिकांच्या मनात हक्काची जागा निर्माण केली आहे. 'टाइमपास','घरत गणपती','कॉफी आणि बरंच काही','आम्ही दोघी' अशा चित्रपटांच्या माध्यमातून त्याने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. अलिकडेच भूषण प्रधान 'जुनं फर्निचर', 'घरत गणपती', 'ऊन सावली' या चित्रपटांमध्ये पाहायला मिळाला. या चित्रपटांमधील त्याच्या कामाचं सर्वत्र कौतुक झालं. त्यातच आता एका मुलाखतीत भूषणने प्रसिद्धीनंतर काम मिळणं सोपं असतं की कठीण यावर भाष्य केलं आहे.
नुकतीच भूषण प्रधानने कलाकृती मीडियाला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये अभिनेत्याला प्रश्न विचारण्यात आला की, कलाकारांना प्रसिद्धी मिळवल्यानंतर काम मिळणं सोपं असतं की कठीण याबद्दल बोलताना अभिनेता म्हणाला, "मला असं वाटतं स्ट्रगल हा प्रत्येकवेळी असतो. पण, सुरुवातीला असं असतं की तुम्ही प्रोजेक्टसाठी उपलब्ध आहात की नाही? तर आम्ही दुसरं कोणीतरी बघू. त्यानंतर तुम्ही उपलब्ध आहात की नाही? आहात तर आम्ही तुमच्यासाठी थांबू. तर हा एक फरक जाणवतो. प्रत्येकजण आपल्यासाठी थांबतो असंही नसतं. तेव्हा खऱ्या अर्थाने वाटतं की हा चित्रपट माझ्यासाठी बनला आहे."
पुढे अभिनेत्याने म्हटलं, "हा संयम असल्यामुळे या गोष्टी घडतात. कोणतीही गोष्ट स्थिर नसते स्ट्रगल हा कुठल्याही स्टेजला कायम असतो. त्यामुळे भारावून जाऊन चालत नाही. आज मला फिल्म्स येत आहेत. आता माझं सगळं उत्तम सुरु आहे, असं नसतं. ही एक प्रोसेस असते. तुम्हाला या गोष्टींचा आनंद घेता आला पाहिजे. जेव्हा आपल्याकडे कामं नसतात तेव्हा सुद्धा तो काळ जगता आला पाहिजे. कारण तेव्हा आपली शिकण्याची वेळ असते."