Join us  

'माझिया प्रियाला प्रीत कळेना' विषयी अभिजीतचा मोठा खुलासा; म्हणाला, 'तुम्ही संधी दिली पण...'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 9:02 AM

Abhijeet khandkekar: 'माझिया प्रियाला प्रीत कळेना' या मालिकेत अभिजीतने मुख्य भूमिका साकारली होती.

'माझिया प्रियाला प्रीत कळेना' या मालिकेच्या माध्यमातून तुफान लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजे अभिजीत खांडकेकर (abhijeet khandkekar). उत्तम अभिनय आणि स्मार्ट पर्सनालिटी यांच्या जोरावर अभिजीतने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली. सध्या अभिजीत 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. अलिकडेच त्याने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये सुरुवातीच्या काळात त्याला इंडस्ट्रीत कसे वाईट अनुभव आले हे त्याने सांगितलं.

अलिकडेच त्याने भार्गवी चिरमुलेच्या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने पहिल्या मालिकेदरम्यान कसा वाईट अनुभव आला हे सांगितलं. या मुलाखतीमध्ये अभिजीतला बालाजी फिल्म्स या प्रोडक्शन हाऊसच्या अनुभवाबद्दल विचारण्यात आले. त्यावर, त्याने त्याचं मत स्पष्टपणे मांडलं.

नेमकं काय म्हणाला अभिजीत?

"खरं तर मी याबद्दल बोलणं टाळतो. ही माझी पहिलीच मालिका आणि याबद्दल मी पूर्णपणे प्रोडक्शन हाऊसला सुद्धा दोष देणार नाही. मात्र, यात अनेक लोकांचा सहभाग असतो. ती माझी पहिलीच मालिका होती. त्यामुळे आता मागे वळून बघतांना असं वाटतं की नाही तेव्हा काही बाबतींमध्ये फारच वाईट वागणूक देण्यात आली होती. 'संधी दिली' असं म्हणत खूपच कमी पैशांमध्ये त्यावेळी आमच्याकडून काम करुन घेण्यात आलं. पण तेसुद्धा ठीकच आहे आणि तो एक व्यवसायाचा भाग आहे. त्यामुळे त्याबद्दल आता रडून काही उपयोग नाही. त्या मालिकेने आम्हाला खूप प्रसिद्धी मिळवून दिली. पण, तरी सुद्धा अगदी लहान-सहान गोष्टींपासून जेव्हा तुम्हाला त्रास दिला जातो तेव्हा असं वाटतं की एक माणूस म्हणून चांगली वागणूक दिली पाहिजे.” असं अभिजीत म्हणाला.

पुढे तो म्हणतो, "या क्षेत्राच्या नियमांनुसार, जे काही आहे त्यात चांगल्या पद्धतीचं जेवण आलं, चांगल्या पद्धतीची वागणूक आली, तर या अनेक गोष्टी झाल्याच नाहीत. मला माहित नाही पण त्यावेळी माझ्यात ते धैर्य कुठून आलं. मी त्या सगळ्याच्या विरोधात आवाज उठवला होता. मी त्या त्या वेळेस त्यांना सुनावलं होतं. कारण, आधी मला कॉर्पोरेटचा अनुभव असल्यामुळे मला माहित होतं की हे चुकीचं आहे. तुम्ही संधी देत आहात, तुम्ही आमच्याकडून मोठं काम करुन घेत आहात. जेणेकरुन आमचं करिअर घडेल, हे सगळं मान्य आहे. पण याचा अर्थ असा नाही की, आम्ही कुणाचे गुलाम आहोत.”

दरम्यान,  अभिजीतने माझिया प्रियाला प्रीत कळेना, माझ्या नवऱ्याची बायको,कानाला खडा, आता होऊ दे धिंगाणा,महाराष्ट्राचा सुपरस्टार सीझन 1, तुझेच मी गीत गात आहे यांसारख्या मालिकांमध्ये तो झळकला आहे. तसंच त्याने जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा, मामाच्या गावाला जाऊया, ढोलताशे, धर्मवीर, फकाट यांसारख्या सिनेमांमध्येही काम केलं आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनअभिजीत खांडकेकरसेलिब्रिटीमराठी अभिनेताटिव्ही कलाकार