'द फॅमिली मॅन' (The Family Man 3) मनोज वाजपेयींची (Manoj Bajpayee) सुपरहिट सीरिज. या सीरिजला प्रेक्षकांनी भरपूर प्रतिसाद दिला. आतापर्यंत याचे दोन सीझन आले. तर आता तिसऱ्या सीजनची सर्वांनाच उत्सुकता आहे. मनोज वाजपेयींनी यामध्ये श्रीकांत तिवारीची भूमिका साकारली आहे. नुकतंच एका मुलाखतीत त्यांनी सीरिजचा तिसरा सीजन कधी येणार याचा खुलासा केला.
लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत मनोज वाजपेयींना सीरिजच्या रिलीज डेटबाबत विचारण्यात आलं. यावर ते म्हणाले, "द फॅमिली मॅन ३ च्या शेवटच्या सीक्वेन्सचं शूट सुरु आहे. डिसेंबरमध्ये प्रोडक्शन संपेल अशी आशा आहे. कोणत्याही वेब सीरिजच्या पोस्ट प्रोडक्शनलाच जास्त वेळ लागतो. या प्रक्रियेत साधारणपणे ९-१० महिने जातातच. सीरिज अनेक भाषांमध्ये डब करणं, सबटायटल्स देणं, एडिटिंग आणि वर्ल्डवाईड स्ट्रॅटेजी बनवणं यात बराच वेळ जातो. ही सर्व प्रक्रिया पुढील वर्षी डिसेंबरच्या आत पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. पुढील दिवाळीला सीरिज रिलीज व्हायला हवी पण ते कामावर अवलंबून आहे."
ते पुढे म्हणाले, "सीरिजच्या तिसऱ्या भागात नक्की किती एपिसोड्स असतील हे तर आता एडिटिंग प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच कळेल. सीझन ३ ची कहाणी पहिल्या दोन सीझनपेक्षा जास्त मोठी आणि कॉम्प्लेक्स असणार आहे. माझी भूमिका आणखी आव्हानात्मक असेल कारण मला कुटुंब आणि नोकरी वाचवण्यासाठी वैयक्तिक आणि प्रोफेशनल अशा दोन्ही मुद्द्यांवर लढावं लागणार आहे."
'द फॅमिली मॅन' मध्ये मनोज वाजपेयी, प्रियमणि, शरिब हाश्मी, अश्लेला ठाकुर हे मुख्य भूमिकेत आहेत. शरद केळकरचीही यामध्ये इंटरेस्टिंग भूमिका आहे. मनोज वायपेयींनी यामध्ये स्पायची भूमिका साकारली आहे. सीरिजच्या दुसऱ्या सीझनमध्ये समंथा रुथ प्रभूही झळकली होती. २०१९ मध्ये सीरिजचा पहिला सीझन आला होता. तर दुसरा सीझन २०२१ मध्ये आला होता.