Join us  

सोनाली कुलकर्णीचं मराठी भाषेबाबत महत्त्वाचं भाष्य, म्हणाली, 'हे' जमलंच पाहिजे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2024 4:59 PM

नुकतंच सोनालीने 'मलाइकोट्टाई वालिबान' सिनेमातून दाक्षिणात्य सिनेसृष्ट्रीतही एन्ट्री केली आहे.

मराठी सिनेसृष्टीची अप्सरा म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने (Sonalee Kulkarni ) तिचा अभिनय आणि नृत्याच्या जोरावर मराठी चित्रपटसृष्टीत तिचा एक वेगळाच ठसा उमटवला आहे. तिचा दमदार अभिनय, अप्सरेसारखं सौंदर्य, तिचा फिटनेस आणि बहारदार नृत्य सगळंच खास. नुकतंच सोनालीने 'मलाइकोट्टाई वालिबान' सिनेमातून दाक्षिणात्य सिनेसृष्ट्रीतही एन्ट्री केली आहे. सध्या या सिनेमामुळे सोनाली चर्चेत आहे. नुकतंच तिने लोकमत फिल्मीशी बोलताना  दाक्षिणात्य सिनेसृष्ट्रीत आलेला अनुभव आणि तेथील संस्कृती आणि मराठी भाषा यावर मत मांडलं. 

दाक्षिणात्य सिनेसृष्ट्रीमधील कोणती गोष्ट तुला मराठीमध्ये आणायला आवडेल, असा प्रश्न मुलाखतीमध्ये तिला विचारण्यात आला होता. यावर ती म्हणाली, 'त्यांची भाषा आणि संस्कृतीप्रती असलेली लॉयलटी आपल्याकडे आणावी वाटेल. फक्त सिनेसृष्ट्रीत नाही तर इतर लोकही  त्याला महत्त्व देतात. केरळमध्ये जर तुम्ही गेलात. तर तिथे तुम्ही त्यांना इंग्रजीमध्ये बोलाल, तर ते तुम्हाला त्यांना येत असेल तरी उत्तरच देणार नाहीत. मुळात ८० टक्के लोकांना येत नाही. ते लोक त्यांची भाषा, संस्कृती, साहित्याच्या बाबतीत प्रचंड प्रामाणिक आहेत. तिथे ६०० स्क्रिन्स फक्त मल्याळम सिनेमांसाठी आहेत. मग इतर भाषेचे सिनेमे लागतात'. 

पुढे ती म्हणाली, 'फक्त चित्रपट नाही तर घरातही लोक फक्त मल्याळम बोलतात. आपल्याकडे तसे होत नाही. फिल्ममेकर, सरकार किंवा इतरांना त्यांचा दोष देऊन चालणार नाही. आपल्या घरात मराठी शिकवण ही प्रत्येकाची वैयक्तिक जबाबादरी आहे. ठीक आहे ना तुम्ही आपल्या मुलांना कॉन्व्हेन्ट शाळेमध्ये शिक्षणासाठी पाठवा, त्यांना इतर सगळ्या भाषा शिकावा. पण,  त्याचबरोबर त्यांना मराठी बोलता आली पाहिजे. ते लादून नाही तर आतून आलं पाहिजे. ते प्रत्येक कुंटुबाने केलं तर त्याचे पडसाद प्रत्येक क्षेत्रात पाहायाला मिळतील. आपल्या संस्कृतीला प्राधान्य दिलं पाहिजे'. 

दरम्यान, सोनालीनं 'मलाइकोट्टाई वालिबान' सिनेमात सुपरस्टार मोहनलाल यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली आहे. सोनालीनं या चित्रपटातील तिचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. आपल्या मनमोहक नृत्यदाकारीने सोनाली दक्षिणेतील प्रेक्षकांनाही घायाळ करणार आहे.  हा चित्रपट तामिळ, तेलुगू, कन्नड मध्ये 25 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. हे. मराठी मनोरंजनसृष्टी गाजवल्यानंतर आता साऊथमध्ये धुमाकूळ घालायला सोनाली सज्ज आहे.  

टॅग्स :सोनाली कुलकर्णीसेलिब्रिटीमराठी अभिनेताTollywood