ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - बॉलिवूडमध्ये धक-धक गर्ल म्हणून परिचित असलेली माधुरी दीक्षितचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. यात सामान्य लोकांपासून खास व्हीव्हीआयपी लोकांचाही समावेश आहे. त्या काळी माधुरीच्या एका ठुमक्यावर अनेक हृदय घायाळ होत होते. बॉलिवूडच्या या धकधक गर्लला आजही पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड उडते. चित्रपटसृष्टीत काहीशी दिसेनाशी झालेल्या माधुरीचा जलवा पाहणारे आजही अनेक चाहते आहेत. 90च्या दशकात माधुरीसोबत स्क्रीन शेअर करण्याचं प्रत्येक मोठ्या अभिनेत्याचं स्वप्न असायचं. माधुरी ऑनस्क्रीन आल्यावर तिचे चाहते तिला पाहतच राहायचे. मात्र तुम्हाला माहिती आहे का, माधुरीला लग्नासाठी अनेक स्थळं येत असतानाच माधुरीच्या लग्नाचा प्रस्ताव सुरेश वाडकरांनी धुडकावला होता. माधुरी दीक्षित ही महाराष्ट्रातील पुराणमतवादी कुटुंबातून होती. माधुरीच्या आईवडिलांचा तिने चित्रपटात काम करण्यास विरोध होता. माधुरीनं लग्न करून घर आणि संसार सांभाळावा, अशी तिच्या आईवडिलांची अपेक्षा होती. माधुरी फारच कमी वयाची असताना तिचे वडील तिच्या लग्नासाठी स्थळ शोधत होते. अनेक प्रयत्नानंतर माधुरीच्या वडिलांना सुरेश वाडकरांचं स्थळ पसंत आलं. त्यावेळी वाडकरांनी संगीतात स्वतःचं करिअर बनवण्यास सुरुवात केली होती. माधुरीचे वडील सुरेश वाडकरांनी मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन गेले. मात्र निराश होऊन त्यांना माघारी परतावं लागलं. लग्नाची मागणी घालण्यात आली होती, त्यावेळी वाडकर माधुरीहून 12 वर्षांहून मोठे होते. मात्र वाडकरांनी माधुरीशी लग्नाचा प्रस्ताव फेटाळला होता. मुलगी खूपच बारीक असल्याचं कारण त्यावेळी वाडकरांनी दिलं होतं. त्यामुळे माधुरीचे वडील निराश होऊन घरी परतले. मात्र त्यानंतर माधुरीचं भाग्यच फळफळलं. 1984मध्ये माधुरीनं अबोध चित्रपटातून पुन्हा पदार्पण केले. 1999मध्ये माधुरीनं डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न करून संसार थाटला. त्यानंतर माधुरी संसारातच रममाण झाली.