Join us

बघतोस काय, मुजरा कर... झाला लंडनमध्ये शूट

By admin | Updated: August 6, 2016 01:48 IST

मराठी सिनेमा खऱ्या अर्थाने ग्लोबल आणि संपन्नही होऊ शकला आहे.

मराठी सिनेमा खऱ्या अर्थाने ग्लोबल आणि संपन्नही होऊ शकला आहे. परदेशात प्रदर्शित होण्याबरोबरच आता शूटिंगही परदेशात करण्याचे प्रमाण वाढले आहे. बजेटचा विचार थोडासा बाजूला ठेवून कथेची गरज म्हणून परदेशात शूटिंग होऊ लागले आहे. दिग्दर्शक हेमंत ढोमे याने अशीच आपल्या कथेसाठी लंडनची गरज असल्याचे सांगितले आणि निर्मात्यांनी ती मान्यही केली. हेमंतचा ‘बघतोस काय, मुजरा कर’ चित्रपट लवकरच येत आहे. या चित्रपटाचे काही शूटिंग सातारा, मुंबईमध्ये झाले; पण बराचसा भाग लंडनमध्ये शूट झाला आहे. ‘लोकमत सीएनएक्स’ला लंडनमधील शूटचा अनुभव सांगताना हेमंत म्हणाला, ‘‘चित्रपटाची कथा लिहितानाच त्यामध्ये लंडनचा उल्लेख होता. त्यामुळे लंडनशिवाय चित्रीकरण पूर्ण होऊच शकत नव्हते. मी लंडनमध्ये शिक्षणासाठी राहिलो आहे; त्यामुळे तेथील अनेक चांगल्या गोष्टी, लोकेशन्स मला माहीत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना लंडनची सैर घडविण्याचे ठरविले. लंडनमधील आकर्षक पर्यटन स्थळे, शहराची वैशिष्ट्ये कॅमेऱ्यात बंदिस्त करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. जितेंद्र जोशी, अनिकेत विश्वासराव, अक्षय टांकसाळे या तिघांचे काही प्रसंग आणि एक गाणे लंडनमध्ये शूट करण्यात आले आहे. ड्रोन कॅमेरा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर लंडनमध्ये शूटिंगसाठी केल्याचे हेमंतने सांगितले. चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण पूर्ण झाले असून, सध्या एडिटिंगचे काम सुरू आहे. लवकरच चित्रपट प्रदर्शनाची तारीख जाहीर होईल, असे त्याने सांगितले. त्यामुळे लंडनमधील अप्रतिम लोकेशन्स मराठी पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षकांना काही काळ प्रतीक्षाच करावी लागणार आहे.