Join us  

LMOTY 2019: गौरी इंगवले अभिनयाची राणी, 'ओवी' नाटकासाठी 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 6:54 PM

अगदी लहानपणापासून अभिनय क्षेत्रात नाव गाजवणारी अभिनेत्री गौरी इंगवले हिला सध्या रंगभूमीवर गाजणाऱ्या 'ओवी' नाटकासाठी  'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ इयर' पुरस्काराने बुधवारी सन्मानित करण्यात आले.

मुंबई - अगदी लहानपणापासून अभिनय क्षेत्रात नाव गाजवणारी अभिनेत्री गौरी इंगवले हिला सध्या रंगभूमीवर गाजणाऱ्या 'ओवी' नाटकासाठी  'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ इयर' पुरस्काराने बुधवारी सन्मानित करण्यात आले. विविध छटा असलेल्या ओवीच्या भूमिकेत गौरीने भरलेले रंग हे या तिच्या भूमिकेचं यश असून त्याची दखल घेत लोकमतने तिचा सन्मान केला. मुंबईत वरळीच्या भव्य एनएससीआय डोममध्ये रंगलेल्या दिमाखदार सोहळ्यात गौरी इंगवलेच्यावतीने हेमांगी कवी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

बालकलाकार गौरी इंगवले हिने २०१२ साली चित्रपटातून आपल्या अभिनय कारकीर्दीला सुरूवात केली.२०१७ साली सादर झालेली ओवी ही एकांकिका आता दोन अंकी नाटकात रंगभूमीवर दाखल झाली आहे. 'ओवी'च्या कथेच्या केंद्रस्थानी आहे मनोविकाराचा गंभीर विषय. एक लहान मुलगी, जिचे आईवडील वारल्यावर ती आपल्या मामाकडे राहते आणि मामा तिला एका आश्रमात आणून ठेवतो. ही मुलगी म्हणजे ओवी. आश्रमातल्या एकंदर वातावरणात तिच्या मनोविकारामुळे काय घडते याचा एक अत्यंत कृतिशील वृत्तांत म्हणजे हे नाटक 'ओवी'. भेदरलेल्या लहान 'ओवी'पासून ते शेवटच्या प्रसंगात आपल्या विकाराशी प्रगल्भपणे सामना करणाऱ्या  'ओवी'पर्यंतचा सगळा प्रवास रसिकांना खिळवून ठेवतो. सादरीकरणातल्या वैविध्यामुळे हे नाटक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरले आहे.निर्माते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या अश्वमी थिएटर्सने या नाटकाची निर्मिती केली असून बाल गौरीसह आणि अभिनेत्री हेमांगी कवी यांच्या या नाटकात प्रमुख भूमिका आहे.

हे होतं परीक्षक मंडळ

केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, ज्येष्ठ गायिका आशा भोसले, पद्मभूषण डॉ. सुरेश अडवाणी, लोकमत ग्रूपचे चेअरमन विजय दर्डा, यूपीएल लिमिटेडचे ग्लोबल सीईओ जयदेव श्रॉफ, रॉनी स्क्रूवाला, फेसबुक इंडिया हेड(मीडिया) अंकुर मेहरा, क्रिकेटवीर अजिंक्य रहाणे, निर्माता-दिग्दर्शक महेश मांजरेकर, ज्येष्ठ अभिनेते सचिन खेडेकर, लोकमत समूहाचे एडिटोरियल अँड जॉइंट मॅनेजिंग डायरेक्टर ऋषी दर्डा, जेएसडब्ल्यू ग्रूपचे अध्यक्ष सज्जन जिंदल, आर के होम सोल्युशन्स मार्केटिंग आणि कन्सल्टन्सीचे एमडी राजेश खानविलकर.

टॅग्स :महाराष्ट्रीयन ऑफ द इअर 2019महाराष्ट्र