कमाल खानला उर्फ केआरके (KRK) ला २०२१मधील विनयभंगाच्या एका प्रकरणात स्थानिक न्यायालयाने जामीन मंजूर केला. उपनगर वर्सोवा पोलिसांनी अभिनेत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पण जामीन मिळूनही, कमाल खान सध्या तुरुंगातच राहणार आहे कारण अभिनेता अक्षय कुमार आणि चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा यांच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त ट्विटशी संबंधित 2020 चा खटला बोरिवली दंडाधिकारी न्यायालयात प्रलंबित आहे. यानंतर आता त्याचा मुलगा फैजलने काही ट्विट्स केले आहेत.
फैजलने केआरकेच्या अकाऊंटवरूनच काही ट्विट्स केले आहेत. यामध्ये त्याने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन, रितेश देशमुख यांच्याकडे मदत मागितली आहे. तसेच "काही लोक माझ्या वडिलांचा जीव घेण्यासाठी त्यांना मुंबईत त्रास देत आहेत. माझ्या वडिलांचा सुशांत सिंह राजपूतसारखा मृत्यू होऊ नये" असं फैजलने ट्विटमध्ये म्हटलं आहे. "मी केआरकेचा मुलगा फैजल कमाल आहे. काही लोक माझ्या वडिलांचा जीव घेण्यासाठी त्यांना मुंबईत त्रास देत आहेत. मी 23 वर्षांचा असून लंडनमध्ये राहतोय. माझ्या वडिलांची कशी मदत करावी हे मला समजत नाही."
"मी अभिषेक बच्चन, रितेश देशमुख आणि देवेंद्र फडणवीसजी यांना विनंती करतो की त्यांनी माझ्या वडिलांचा जीव वाचवावा. मी आणि माझी बहीण त्यांच्याशिवाय जगू शकणार नाही. मी लोकांनाही विनंती करतो त्यांनी माझ्या वडिलांना पाठिंबा द्यावा. त्यांचा सुशांत सिंह राजपूतसारखा मृत्यू होऊ नये" असं फैजलने ट्विटमध्ये म्हटलं आहे. केआरके विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम १५३ (दंगल घडवण्याच्या उद्देशाने प्रवृत्त करणे) आणि ५०० (मानहानीची शिक्षा) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या तरतुदींनुसार FIR नोंदवण्यात आली आहे. केआरके ट्विटरवर बॉलिवूड सेलिब्रिटींवर निशाणा साधतं असतो. विशेषत: स्टारकिड्सबद्दल केलेल्या ट्विटमध्ये केआरकेने अनेकवेळा मर्यादा ओलांडल्या आहेत.
वादग्रस्त ट्विट केल्याप्रकरणी केआरकेला 30 ऑगस्ट रोजी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक करण्यात आली होती. बोरिवली न्यायदंडाधिकारी न्यायालयाने नंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. रविवारी वर्सोवा पोलिसांनी विनयभंग प्रकरणी त्याला ताब्यात घेऊन वांद्रे न्यायालयात हजर केले.
वकील अशोक सरोगी आणि जय यादव यांच्यामार्फत वांद्रे दंडाधिकारी न्यायालयात दाखल केलेल्या जामीन अर्जात कमाल खानने दावा केला की, एफआयआरमध्ये नोंदवलेली माहिती कथित विनयभंगाच्या घटनेशी जुळत नाही. या घटनेच्या १८ महिन्यांनंतर FIR दाखल करण्यात आली आणि पीडितेच्या मैत्रिणीनेही तिला तसे करण्यास सांगितले असल्याचे वकील यादव यांनी न्यायालयासमोर सादर केले. त्यांनी पुढे असा युक्तिवाद केला आहे की कमाल खान याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या ज्या कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ते सर्व जामीनपात्र आहेत.