Join us  

"मला आईने रामायण, महाभारत पाहू दिलं नाही कारण..." कोंकणा सेन शर्माचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2023 10:47 AM

सोबतच तिला अमेरिकी सोप ओपेराही पाहायची परवानगी नव्हती असंही तिने सांगितलं. 

बॉलिवूड अभिनेत्री आणि दिग्दर्शिका कोंकणा सेन शर्मा (Konkana Sen Sharma) नुकतीच तिच्या एका वक्तव्याने चर्चेत आली आहे. लहानपणी आपण सर्वांनीच रामायण आणि महाभारत टेलिव्हिजनवर पाहिलं असेलच. पण कोंकणाला तिची आई अपर्णा सेनने कधीच टेलिव्हिजनवर रामायण आणि महाभारत पाहू दिलं नसल्याचा खुलासा केला आहे. सोबतच तिला अमेरिकी सोप ओपेराही पाहायची परवानगी नव्हती असंही तिने सांगितलं. 

'फिल्म कंपॅनियन'ला दिलेल्या मुलाखतीत कोंकणा म्हणाली, 'मला टीव्हीवर रामायण आणि महाभारत पाहायची परवानगी नव्हती. मी हे महाकाव्य आधी वाचले पाहिजेत मग बघितले पाहिजेत असं मला आईने सांगितलं होतं. या महाकाव्यांना तुम्ही इतरांच्या कल्पनेनं नाही तर आधी स्वत:च्याच कल्पनेने जाणून घेतलं पाहिजे. याशिवाय मी बरेच वैश्विक आणि क्षेत्रीय चित्रपट बघितले. मी भारतीय साहित्य वाचले आहेत.'

ती पुढे म्हणाली, 'मला आईने कधी हिंदी आणि बंगाली चित्रपटही पाहू दिले नाही. त्यामुळे मला बरेच वेगळ्या प्रकारचे चित्रपट पाहायला मिळाले. याशिवाय द बोल्ड अँड ब्युटिफुल आणि सांता बारबरा सारखे अमेरिकी सोप ओपेराही पाहायची परवानगी दिली नाही. आई नेहमी माझ्यासोबत मोठ्यांसारखं वागायची. मी लहानाची मोठी असताना तिने मला मोठ्यांसारखीच वागणूक दिली. मला माझी स्पेस दिली. यामुळे मला खूप मदत मिळाली.'

कोंकणा सेन शर्मा ही अभिनेत्री अपर्णा सेन आणि पत्रकार मुकुल शर्मा यांची मुलगी आहे. वयाच्या चौथ्या वर्षापासूनच कोंकणा अभिनय करत आहे. तिने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. याशिवाय ती उत्तम दिग्दर्शनही करते. कोंकणा नुकतीच 'कुत्ते' सिनेमात दिसली होती. तर आता ती आगामी 'सूप' या वेबसिरीजमध्ये दिसणार आहे. याशिवाय नुकत्याच रिलीज झालेल्या 'लस्ट स्टोरीज 2' मधील 'द मिरर' या स्टोरीचं दिग्दर्शन तिने केलं आहे. यासाठी तिचं प्रचंड कौतुक होत आहे.

टॅग्स :कोंकणा सेन शर्माअपर्णा सेनबॉलिवूडमहाभारतरामायण