Join us  

'एक अखंड 'देश' म्हणून एकत्र बांधणारा... ', किरण मानेंची बाबासाहेबांना मानवंदना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2023 5:18 PM

महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज सिनेसृष्टीतूनही बाबासाहेबांना अभिवादन केलं जातंय.

 6 डिसेंबर हा दिवस म्हणजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन होय. 1956 साली याच दिवशी दिल्ली येथील राहत्या घरी डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचं निधन झालं. त्यामुळंच या दिवसाला 'महापरिनिर्वाण दिन' किंवा 'महापरिनिर्वाण दिवस' म्हटलं जातं. महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज सिनेसृष्टीतूनही बाबासाहेबांना अभिवादन केलं जातंय. अभिनेते किरण माने यांनी एक खास पोस्ट शेअर करत आंबेडकरांना मानवंदना दिली. 

फेसबुकवर किरण माने यांनी बाबासाहेबांचा एक फोटो शेअर केला. पोस्टमध्ये त्यानी लिहले, 'याच्यापेक्षा देखणा 'हिरो' मी आयुष्यात पाहिलेला नाही भावांनो... नादखुळा ॲटिट्युड. हजारो वर्ष चालत आलेल्या वर्चस्ववादावर लाथ घालून शोषितांच्या अनेक पिढ्यांचा उद्धार करणारा हा खरा योद्धा!' 

पुढे त्यांनी लिहले, 'जात, धर्म, वंश, पंथ, रूढी, परंपरा, रंग, भाषा, वेश, अन्न, इतिहास, भुगोल, हवामान, तापमान सगळ्या-सगळ्या बाबतीत प्रचंड वैविध्य असलेल्या या विशाल भूभागाला एक अखंड 'देश' म्हणून एकत्र बांधणारा... प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य-समता-बंधुता-न्याय ही मुल्यं देऊन स्वत:चा विकास करण्याचा अधिकार देणारं संविधान लिहीणारा खराखुरा महानायक! डाॅ. बाबासाहेब आंबेडकर... विनम्र अभिवादन.जय भीम'. 

मुंबईतील दादरमधील चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. अरबी समुद्राला लागून असलेल्या बाबासाहेबांच्या समाधीला भेट देण्यासाठी भारतभरातून लाखो येतात. अत्यंत आदरानं चैत्यभूमीला भेट देतात. बाबासाहेबांची प्रतिमा व मुर्तीसमोर अभिवादन करतात. दरम्यान किरण माने कलाविश्वासह सोशल मीडियावरही कमालीचे सक्रीय आहेत. पोस्टद्वारे सामाजिक किंवा कलाक्षेत्रात घडणाऱ्या अनेक विषयांवर परखडपणे आपलं मत मांडत असतात.  

टॅग्स :किरण मानेबॉलिवूडसेलिब्रिटी