Join us  

"पात्र व्यक्तीला काम मिळण्याऐवजी...", किरण मानेनं सांगितलं मराठी कलाविश्वातील धक्कादायक वास्तव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 2:24 PM

किरण माने यांनी मराठी इंडस्ट्रीमध्ये लॉबी कशी चालते, याचा मोठा खुलासा केला. 

बिग बॉस मराठी शोमधून प्रकाशझोतात आलेला अभिनेता म्हणजे किरण माने. उत्तम अभिनयासह स्पष्टवक्तेपणामुळे ते कायम चर्चेत येत असतात. किरण माने सामाजिक किंवा कलाक्षेत्रात घडणाऱ्या अनेक विषयांवर परखडपणे आपलं मत मांडत असतो. मराठी मनोरंजन विश्वातील लॉबी हा विषय कायम चर्चेत असतो. नुकतेच एका मुलाखतीमध्ये किरण माने यांनी  मराठी इंडस्ट्रीमध्ये लॉबी कशी चालते, याचा मोठा खुलासा केला. 

किरण माने यांनी कॉकटेल स्टुडिओला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी मराठी इंडस्ट्रीबद्दल मोठे खुलासे केले. मुलाखतीमध्ये त्यांना 'मराठी इंडस्ट्रीमध्ये जातीयवाद किंवा लॉबीज आहेत का?', असा प्रश्न विचारण्यात आला. यावर माने यांनी म्हटलं, 'मराठी इंडस्ट्रीमध्ये छोटे-छोटे गट आहेत. याला मी डबकं म्हणतो. ते एकमेंकाना कामं देत राहतात. तुम्ही जर नीट पाहिलं तर एखादा दिग्दर्शक असतो, तो त्याच- त्याच नटांना घेत जातो. मुलाखतीमध्ये ते एकमेकांना मोठं करतात. एकमेंकाचं कौतुक करतात. काम देताना मी हे अनुभवलं की पात्र व्यक्तीला काम मिळण्याऐवजी जवळच्या व्यक्तीला काम दिलं जातं'.

माने यांनी पुढे सांगितलं की, 'आपण कायम म्हणतो की मराठी इंडस्ट्रीमध्ये सकस कलाकृती फार कमी निर्माण होतात. नाटकात, सिनेमात जागतिक दर्जाच्या कलाकृती निर्माण होत नाहीत. कारण, खूप नितळ मनाने काही केलं जात नाही. मराठी सिनेमे चालत नाहीत. मराठीत असा एकही नट नाही, ज्याचा सिनेमा पाहायला झडझडून लोक येतील. याला कारण ही लॉबीच आहे. सिनेमात अमुक-अमुक नटाला घेतलं जातं. जर तुम्ही पाहिलं तर महाराष्ट्राचा फेवरेट अवॉर्ड हा काही अपवाद वगळता ज्यांचे सिनेमे चाललेच नाहीत. त्यांना दिला जातो. चॅनलची ज्या लोकांशी मैत्री आहे, त्यांना निवडलं जातं'.

लॉबीचा एक अनुभव सांगत माने म्हणाले, 'परफेक्ट मिस-मॅच' हे माझं नाटक आहे. या नाटकात मातीमधला रांगडा तरुण  आणि एक उच्चभ्रू तरुणीची लव्हस्टोरी आहे. यासाठी मी एका निर्मात्याची भेट घेतली आणि त्याला स्टोरी आवडली. पण, तो मला म्हणाला की तुझ्यासोबत काम करायला कोणी अभिनेत्री तयार नाहीत. यावर मी त्याला टॉपच्या अभिनेत्रीची नाव विचारली.  त्यानं मला अभिनेत्री मुक्ता बर्वे, सोनाली कुलकर्णी आणि अमृता सुभाष यांची नाव सांगितली'.

माने पुढे म्हणाले, 'मुक्ता ही एका दुसऱ्या नाटकात व्यस्त होती. तर मग मी सोनाली आणि अमृताला स्टोरी पाठवली.  तर सोनाली आणि अमृता यांनी नाटक करण्यासाठी होकार दर्शवला. मग मी पुन्हा त्या निर्मात्याकडे गेलो. तेव्हा तो नाटक करण्यासाठी तयार झाला. पण, मी त्याला नकार दिला. त्याने मला नाकारलं, कारण त्या नाटकामध्ये त्याला त्याचा नट घ्यायचा होता.  यानंतर मी आणि अमृताने नाटकं केलं आणि ते तुफान गाजलं. तर अशी लॉबी मराठी इंडस्ट्रीमध्ये चालते. मराठी इंडस्ट्रीमधील लॉबी प्रकार बंद झाला तर मराठी सिनेमा नक्कीच पुढे जाईल'.

  

टॅग्स :किरण मानेसेलिब्रिटीमराठी अभिनेतामराठी चित्रपट