Join us  

प्रेग्नंन्सी आणि नाटकाचा प्रयोग! कविता मेढेकरांनी सांगितला 'तो' प्रसंग, म्हणाल्या- "त्यानंतर खूप रडले, कारण..."

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2024 1:33 PM

५ महिन्यांची गरोदर असताना केला नाटकाचा प्रयोग, कविता मेढेकर म्हणाल्या, "त्यानंतर खूप रडले कारण..."

मराठी कलाविश्वातील अनेक दिग्गज कलाकारांपैकी एक म्हणजे कविता लाड मेढेकर. अनेक मालिका, नाटक आणि सिनेमांतून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. 'चार दिवस सासूचे' या मालिकेमुळे त्या प्रसिद्धीझोतात आल्या होत्या. तर 'एका लग्नाची गोष्ट' हे त्यांचं नाटकही प्रचंड गाजलं. या नाटकात कविता मेढेकर आणि प्रशांत दामले मुख्य भूमिकेत होते. या नाटकादरम्यानची एक आठवण कविता मेढेकर यांनी सांगितली आहे. 

झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळ्यात कविता मेढेकर यांनी 'एका लग्नाची गोष्ट' नाटकाच्या प्रयोगादरम्यानचा एक प्रसंग सांगितला. या नाटकाच्या प्रयोगावेळी कविता मेढेकर ५ महिन्यांच्या गरोदर होत्या. 'एका लग्नाची गोष्ट' नाटकाच्या प्रयोगादरम्यान घडलेला प्रसंग सांगताना त्या म्हणाल्या, "नाटक ही माझी सर्वात आवडती कला...रंगभूमीमुळे मला अभिनयाची गोडी लागली. मी पहिल्या मुलाच्या वेळेस गरोदर असताना ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला होता. नाटकासाठी दौरे होतात. त्यामुळे एखाद्या प्रयोगाच्या वेळेस बाळाला बरं नसेल तर मी कसा प्रयोग करू शकेन. शूटिंगचं पुढे मागे होऊ शकतं. पण, प्रयोग होऊ शकत नाही. त्यामुळेच आणि मातृत्व अनुभवण्यासाठी मी ब्रेक घेतला होता. मी नाटकाच्या निर्मात्यांना सांगितलं होतं की मी नाटक सोडत आहे. त्यामुळे तुम्ही कोणती तरी दुसरी अभिनेत्री बघा. तिसरा, चौथा, पाचवा महिना लागला तरी त्या दुसरी मुलीची रिहर्सल होत होती. शेवटी पाचवा महिना लागल्यावर मी त्यांना सांगितलं की आता मला जमणार नाही. आणि मग माझा शेवटचा प्रयोग लागला." 

पुढे भावुक होत त्या म्हणाल्या, "चिंचवडला एका लग्नाची गोष्टचा शेवटचा प्रयोग लागला होता. मी पहिल्यांदाच गरोदर होते. त्यामुळे मी उत्सुक होते. आता धावपळ बंद होणार, यामुळे मी खूप खूश होते. पण, तिसरी घंटा झाली आणि रंगमंचावर एन्ट्री घेण्यापूर्वी माझ्या मनात विचार आला की ही माझी शेवटची एन्ट्री आहे. यानंतर मी पुन्हा कधी रंगभूमीवर येईन हे माहीत नव्हतं. मला अजूनही आठवतं की मी एन्ट्री घेतली...बसस्टॉपवरचा माझा आणि प्रशांतचा पहिला सीन होता. प्रत्येक वाक्याला मला जाणवत होतं की मी हे वाक्य शेवटचं म्हणतेय. नाटक संपेपर्यंत प्रशांत आणि इतर कलाकारांना जाणवलं होतं की माझा हा शेवटचा प्रयोग आहे, हे मला जाणवलं आहे. परत कधी रंगभूमीवर येईन हे मला माहीत नाही. नाटक संपलं पडदा पडला आणि मला इतकं रडू फुटलं....पण, रडू कशासाठी होतं हेही मला माहीत नव्हतं. मला जे आवडतं ते करायचं थांबवलं म्हणून की पुढचं माहीत नाही म्हणून...एका चांगल्या गोष्टीसाठी मी नाटक थांबवत होते. त्यामुळे वाईट वाटण्यचंही काहीच कारण नव्हतं. पण, तेव्हा खूप रडू आलं होतं."

"त्यानंतर एका लग्नाची पुढची गोष्टचा पहिला प्रयोग...अनेक वर्षांनी मी पुन्हा एकदा मनी म्हणूनच एन्ट्री घेणार होते. आणि ऑडियन्समधून माझी एन्ट्री होती. मला भीती वाटत होती...धडधडत होतं. एन्ट्री घेतली त्या क्षणाला वाटलं की हा सगळा ऑडियन्स माझ्या बाजूने आहे. त्यांना मला बघायचं आहे, असं फिलींग आलं. तो क्षण मी कधीच विसरणार नाही. अजूनही आठवलं की भरून येतं," असंही कविता मेढेकर यांनी सांगितलं. सध्या कविता मेढेकर झी मराठी वाहिनीवरील 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेत भुवनेश्वरी हे पात्र साकारत आहेत. 

टॅग्स :कविता लाडप्रशांत दामलेनाटकएका लग्नाची पुढची गोष्ट