‘नागिन’ या विषयाची बॉलिवूडमध्ये सुरुवातीपासूनच क्रेझ राहिली आहे. १९७६मध्ये आलेला ‘नागिन’ असो वा १९८६मधील ‘नगिना’ असो; हे चित्रपट आजही प्रेक्षकांसाठी आॅल टाइम फेव्हरेट ठरत आहेत. मग या विषयावर २०१५ मध्ये आलेल्या ‘नागिन’ या मालिकेला प्रेक्षकांनी पसंती दिली नाही तरच नवल. एका खासगी वाहिनीवरील ‘नागिन’ मालिका सुपरहिट ठरल्यानंतर या मालिकेचा दुसरा सीझन लवकरच सुरू होत आहे. सीझन ‘लव्ह अॅण्ड वॉर’वर आधारित असल्याने प्रेक्षक त्याला कितपत पसंती दर्शवतील, हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. मालिकेत मुख्य भूमिकेत असलेली शेषा, अर्थात अदा खान हिच्याशी संवाद साधून नव्या सीझनमधील काही गूढ उकलण्याचा केलेला हा प्रयत्न...‘नागिन’चा दुसरा सीझन पहिल्या सीझनच्या तुलनेत आणखीच ‘जहरिला’ असल्याचे बोलले जात आहे, काय सांगशील?-‘नागिन’च्या नव्या सीझनमध्ये ‘वॉर के साथ प्यार’ असल्याने प्रेक्षकांना अनेक रोमांचक प्रसंग बघायला मिळणार आहेत. मी, मौनी रॉय, रितिक रहेजा आणि अर्जुन बिजलानी यांच्यातील रोमाँटिक ट्रॅक अनेक सस्पेन्स निर्माण करणारे असल्याने यातूनच मालिका ‘जहरिली’ होत जाईल. अर्थात, या सर्व घटना प्रसंगानुरूप असल्याने प्रेक्षकांना नकारात्मकतादेखील भावेल. या ‘लव्ह ट्रॅँगल’मध्ये नागिनचा अवतार बघण्यासारखा असेल. कारण, मॉडर्न नागिन पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने, प्रेक्षकांच्या मनात मालिकेबाबतची उत्सुकता ही पहिल्या सीझनपेक्षा अधिक असेल. खरं तर मॉडर्न नागिन साकारणे माझ्यासाठी आव्हानात्मक होते. फिगर मेंटेन्ड ठेवण्यासाठी मला तासन् तास जिममध्ये वर्कआऊट करावे लागत असे. त्यातच बरेचसे शूटिंग रात्री करावे लागल्याने नवा सीझन आव्हानात्मक होता.निगेटिव्ह भूमिकेसाठी तू ओळखली जात आहेस, याचा तुझ्या इमेजवर परिणाम होईल, याची तुला भीती वाटत नाही का?-मी माझ्या करिअरची सुरुवात पॉझिटीव्ह भूमिकेने केली आहे. त्यामुळे एखाद्या निगेटिव्ह भूमिकेचा लगेचच इमेजवर परिणाम होईल, असे मला वाटत नाही. शिवाय, ‘नागिन-२’मध्ये माझी निगेटिव्ह भूमिका ही प्रसंगानुरूप असल्याने प्रेक्षक यामागच्या कारणांचा नक्कीच विचार करतील. गेल्या सीझनमध्ये मला याची प्रचिती आली आहे; परंतु या भूमिकेमुळे मला निगेटिव्ह भूमिका साकारणे किती आव्हानात्मक आहे, याची जाणीवदेखील झाली आहे. मला असे वाटते, की कलाकाराने सर्व प्रकारच्या भूमिका साकारायला हव्यात. एक परिपक्व कलाकार बनण्यासाठी हे गरजेचे आहे. माझा प्रवास त्याच दिशेने सुरू आहे. मी भूमिकेच्या स्वरूपापेक्षा पात्र साकारताना येणाऱ्या आव्हानांचा अधिक विचार करते. ‘नागिन’च्या अवतारात डोळ्यांचे एक्स्प्रेशन खूप महत्त्वपूर्ण असतात, तू हे आव्हान कसे पेलले?-आय अॅम ग्लॅड! नागिन मालिकेतील भूमिका साकारण्यापूर्वी मी रीना रॉय यांचा ‘नागिन’ आणि श्रीदेवी यांचा ‘नगिना’ हे चित्रपट वारंवार बघितले. त्यांची देहबोली, त्यातही विशेषत: डोळ्यांच्या एक्स्प्रेशन्सचे निरीक्षण केले. खरं तर नागिन पात्र साकारण्यासाठी ‘डोळे’ जुलमी असायलाच हवेत. मुळात माझे डोळे सुंदर असल्यानेच या पात्रासाठी निवड झाली असेल. मालिकेत मी फेशियलबरोबरच डोळ्यांच्या सुंदरतेवर लक्ष दिले. डोळे प्रॉमिनंट दिसावेत, याकरिता मी बऱ्याचदा लेन्स वापरत असे. एकताने डोळ्यांच्या एक्स्प्रेशन्सवर बरेचसे काम केले, हे सांगावेसे वाटते. तुझ्या ‘ड्रीम रोल’विषयी काय सांगशील?-चित्रपटात काम करणे हाच माझा ड्रीम रोल असेल. योग्य संधी मिळाल्यास मी नक्कीच बॉलिवूडमध्ये काम करण्याच्या दृष्टीने विचार करणार आहे. सध्या ग्लॅमरस लुकपेक्षा तुमच्यातील अभिनय क्षमतेचादेखील विचार केला जातो. त्यातच स्पर्धा असल्याने तुमच्यातील एक चूक आलेल्या संधीपासून तुम्हाला हिरावू शकते. हा सगळा विचार करून मी माझ्या कामावर लक्ष केंद्रित केले आहे. नागिनच्या नव्या सीझनबाबत मी खूप उत्साही असून, या भूमिकेमुळे मला अभिनयाच्या संधीचे आणखी दरवाजे उघडतील, असा मला विश्वास वाटतो.
कातिलाना ‘अदा’
By admin | Updated: October 15, 2016 06:14 IST