लोकमत न्युज नेटवर्कमुंबई : दलित, तसेच गोरगरिबांवरील अत्याचाराविरोधात दलित पँथरसारख्या चळवळीतून विद्रोहाची तलवार उपसत आपल्या साहित्याद्वारे समाजाला आरसा दाखविणारे विद्रोही कवी पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारलेल्या ‘चल हल्ला बोल’ चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने परवानगी नाकारली आहे. चित्रपटातील सर्व कविता काढून तो प्रदर्शित करण्याची अट सेन्सॉर बोर्डाने निर्मात्यांसमोर ठेवली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ‘कोण नामदेव ढसाळ, आम्ही ओळखत नाही’ असे नोटीसमध्ये म्हटल्याचे चित्रपटाचे दिग्दर्शक महेश बनसोडे यांनी सांगितले.
नामदेव ढसाळ यांनी ‘गोलपीठा’ या कविता संग्रहातून दलित समाजातील जळजळीत वास्तव समाजासमोर आणले. त्या कवितांवरच आक्षेप घेत ढसाळ यांच्यासारख्या व्यक्तिमत्वाला ओळखत नसल्याचे सेन्सॉर बोर्डाने म्हटल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. ‘चल हल्ला बोल’ या चित्रपटाला ‘यू’ सर्टिफिकेट नाकारण्यात आले असून, ‘ए’ श्रेणीसाठी सेन्सॉर बोर्डाने अनेक सूचना केल्या आहेत. चित्रपटाच्या निर्मात्यांना सेन्सॉर बोर्डाचे अधिकारी रेवणकर आणि सय्यद रबी हश्मी यांनी नोटीस पाठविली होती. यात ‘नामदेव ढसाळ कोण आहेत, आम्हाला माहीत नाही. त्यांच्या कविता काढल्या तरच चित्रपटाच्या प्रदर्शनाला परवानगी मिळेल’, असे नमूद केल्याचे महेश बनसोडे यांनी सांगितले.
‘वाघ्या-मुरळी’ला म्हटले स्टेज डान्ससेन्सॉर बोर्डाने नोटीसमध्ये वाघ्या-मुरळीच्या लोकनृत्याला स्टेज डान्स असल्याचे म्हटले आहे. तसेच मंदिराची दृश्ये काढायला सांगितले आहे. हरामखोर शब्द आणि कवितेतील काही शब्द काढण्यास सांगितले आहे.