जॉन अब्राहम निर्माता असलेल्या आणि गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या ‘रॉकी हँडसम’ या चित्रपटाला बॉक्स आॅफिसवर जास्त यश मिळाले नाही. पहिल्या चार दिवसांत या चित्रपटाने १६ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. ४५ कोटी रुपयांचे बजेट असलेल्या या चित्रपटाचे हे उत्पन्न अगदीच नगण्य आहे. हेही विसरून चालणार नाही की, हा चित्रपट गुरुवारी प्रदर्शित झाला आणि त्यानंतर तीन दिवसांची सुटीही होती. त्यानंतरही या चित्रपटाचा व्यवसाय हा अपेक्षित नाही. दुबळे कथानक असल्यामुळे प्रेक्षकांनी या चित्रपटाबाबत निराशा व्यक्त केली आहे. त्यामुळेच सोमवारपासून या चित्रपटाचा व्यवसाय घसरताना दिसत आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार या चित्रपटाचे उत्पन्न या आठवड्याच्या अखेरपर्यंत २० कोटी रुपयांपर्यंत असेल. असे झाले तर या चित्रपटाच्या निर्मात्यांना मोठा तोटा सहन करावा लागणार आहे. यापूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाबाबत बोलायचे झाल्यास कौटुंबिक कथानक असलेला करण जोहर कंपनीचा चित्रपट कपूर अॅण्ड सन्सने सलग दुसऱ्या आठवड्यात चांगला व्यवसाय केला आहे. पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने २६ कोटींचा व्यवसाय केला होता. तर दुसऱ्या आठवड्यात चित्रपट ६० कोटींपर्यंत मजल मारत आहे. एक चांगले यश म्हणून याकडे बघितले जात आहे. हिमेश रेशमियाचा तेरा सुरुर हा चित्रपटही बॉक्स आॅफिसवर अपयशी ठरला आहे. १४ कोटींच्या उत्पन्नाबरोबरच चित्रपट या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. दिग्दर्शक आर. बाल्की यांचा नवा चित्रपट ‘की अॅण्ड का’ शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात प्रथमच अर्जुन कपूर आणि करीना कपूर यांची जोडी पडद्यावर दिसेल. बाल्कींचा चित्रपट असल्याने या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
जॉनची जादू फिकी, रॉकी हँडसम फ्लॉप
By admin | Updated: March 29, 2016 02:12 IST