Join us  

रेल्वे ट्रॅकवर आत्महत्या करण्यासाठी गेले होते जॉनी लिव्हर, म्हणाले, "वडिलांना कंटाळून..."

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 9:11 AM

१३ वर्षांचे असताना जॉनी लिव्हर यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. एका मुलाखतीत लहानपणीचा हा प्रसंग त्यांनी सांगितला आहे.

विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना खळखळवून हसवणारा आणि कॉमेडीचा बादशहा अशी मिळवलेला अभिनेता म्हणजे जॉनी लिव्हर.  ८०च्या दशकात बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलेल्या जॉनी लिव्हर यांनी एक काळ गाजवला. 'बाजीगर', 'राजा हिंदुस्तानी', 'दुल्हे राजा', 'आमदनी अठ्ठानी खर्चा रुपया', 'खट्टा मीठा', 'गोलमाल' अशा अनेक सुपरहिट सिनेमांत त्यांनी काम केलं. प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणणाऱ्या जॉनी लिव्हर यांना मात्र त्यांच्या आयुष्यात अनेक कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला. 

जॉनी लिव्हर यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत लहानपणीचा एक प्रसंग सांगितला आहे. १३ वर्षांचे असताना जॉनी लिव्हर यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. युट्यूबर रणवीर अल्लाहबादियाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याचा खुलासा केला. ते म्हणाले, "लहानपणी खूप कठीण परिस्थिती होती. मलाच माझ्या कुटुंबाचा सांभाळ करावा लागत होता. जेव्हा मी बाहेर काम करून घरी पैसे आणायचो तेव्हाच घरात जेवण बनायचं. माझे वडील कामावर जायचे नाहीत. मित्रांबरोबर जाऊन ते दादागिरी करायचे. ते जिवंत घरी येतील याचीही शाश्वती नसायची." 

"१३ वर्षांचा असताना मी रेल्वेच्या ट्रॅकवर आत्महत्या करण्यासाठी गेलो होतो. माझ्या वडिलांच्या वागण्यााला कंटाळून मी हे पाऊल उचललं होतं. मी पटरीवर गेलो. समोरून ट्रेन येत होती. पण, तेव्हा माझ्यासमोर माझ्या तीन बहिणींचे चेहरे आले. त्यांचं काय होईल? या विचाराने मी आत्महत्येचं पाऊल मागे घेतलं," असंही ते पुढे म्हणाले. 

टॅग्स :जॉनी लिव्हरसेलिब्रिटी